वर्षभरानंतर प्रथमच एकत्र आलेल्या मनसे-भाजप-शिवसेना यांच्या महायुतीमुळे महापालिकेच्या राजकारणात आमूलाग्र बदल होण्याची नांदी झाली असून सर्वच्या सर्व प्रभाग समित्यांवर महायुतीने कब्जा करत विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीला हादरे देण्यास सुरुवात केली आहे. प्रभाग समिती सभापती निवडणुकांच्या निमित्ताने जुळलेले हे सूर आता स्थायी समितीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना दिलासा देणारे ठरणार आहे. मंगळवारी चुरशीच्या ठरलेल्या पूर्व प्रभाग सभापतीपदी चिठ्ठी पद्धतीत मनसेच्या वंदना शेवाळे यांची लॉटरी लागली तर पश्चिम प्रभागात भाजपचे डॉ. राहुल आहेर यांची अविरोध निवड झाली.
महापालिकेत सत्ता हाती असूनही फारसे हातपाय हलवू न शकलेल्या सत्ताधाऱ्यांनी यंदा प्रभाग समित्यांसह स्थायी समितीवर कब्जा करण्याच्या दृष्टिकोनातून आखलेल्या व्यूहरचनेला शिवसेनेची साथ मिळाल्याने हतबल झालेल्या मनसे व भाजपला दिलासा मिळाला आहे. सोमवारी सहापैकी चार प्रभाग समित्यांची निवडणूक झाली होती. उर्वरित पूर्व व पश्चिम प्रभाग समित्यांची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पार पडली. त्यात पूर्व प्रभागात अपक्ष गटातर्फे शहर विकास आघाडीच्या रशिदा शेख व मनसेच्या वंदना शेवाळे यांच्यात लढत झाली. या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी १२ म्हणजे समान मते पडल्याने चिठ्ठी पद्धतीचा मार्ग अनुसरावा लागला. त्यात मनसेच्या शेवाळे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने पूर्व प्रभाग समिती सभापतीपदी त्यांची निवड जाहीर करण्यात आली. या समितीत अपक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी या विरोधी गटाचे प्राबल्य असल्याने ती ताब्यात येते की नाही, याबद्दल साशंकता होती. परंतु, दोन्ही उमेदवारांना सारखी मते पडली आणि चिठ्ठी पद्धतीच्या सोडतीत महायुतीची लॉटरी लागली. पश्चिम प्रभागात महायुतीचे प्राबल्य होते. यामुळे पूर्व प्रभागासारखी या ठिकाणी चुरस झाली नाही. महायुतीच्या वतीने भाजपच्या डॉ. राहुल आहेर यांनी अर्ज भरला होता. त्यामुळे मनसेच्या सुनीता मोटकरी व सुरेखा भोसले यांनी माघार घेतली आणि ही निवडणूक अविरोध झाली. पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतीपदी डॉ. आहेर यांच्या नावाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली.
या निमित्ताने सर्वच्या सर्व म्हणजे सहा प्रभाग समित्यांवर महायुतीने वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश प्राप्त केले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत ४० जागा मिळवून मनसे सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरला होता. भाजपच्या सोबतीने मनसेने सत्ता तर काबीज केली, परंतु, पालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीसह चार प्रभाग समित्या गमवाव्या लागल्या होत्या. स्थायीसारख्या महत्त्वपूर्ण समितीपासून वंचित राहावे लागल्याने कारभार हाकताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याबाबत हतबलता व्यक्त केली होती. या पाश्र्वभूमीवर, मनसेने आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत स्थायी समितीसह प्रभाग समित्या हातातून निसटणार नाही, याकरिता नियोजन करण्यास सुरुवात केली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाआघाडीत फूट पाडून शिवसेनेचे समर्थन मिळविण्यात यश मिळाले. या माध्यमातून मनसे-भाजप-शिवसेना यांच्या सहयोगाने आकारास आलेल्या महायुतीने पालिकेच्या राजकारणातील समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे.

Story img Loader