महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू होणाऱ्या बारावी आणि दहावीच्या प्रात्याक्षिक आणि लेखी परीक्षांवर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा बहिष्कार कायम असताना ८ फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षासंबंधी शिक्षण मंडळातून वितरित केले जाणारे साहित्य शिक्षण संस्था व मुख्याध्यापकांनी स्वीकारू नये, असे आवाहन शिक्षण संस्था महामंडळाने केले आहे.
सर्व शाळांना थकित व वेतनेत्तर अनुदान नियमाप्रमाणे विनाअट देण्यात यावे, विना अनुदानित शाळांचे मूल्यांकनाचे निकष शिथील करण्यात यावे, शाळांच्या मान्यता काढण्यापूर्वी सुधारणा करण्यासाठी नियमाप्रमाणे वाजवी संधी शाळांना देण्यात यावी इत्यादी मागण्यांसंदर्भात राज्य शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी विनंती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने निवेदनातून केली होती. शासनाकडे या मागण्यांच्या संदर्भात पाठपुरावा करण्यात आला, मात्र शासनाने शिक्षण संस्था आणि शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ आणि शिक्षकांच्या विविध संघटनांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना प्रात्याक्षिक आणि लेखी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. शिक्षकांच्या या बहिष्कारामुळे अनेक शिक्षण संस्थांमध्ये बारावीची प्रात्याक्षिक परीक्षा घेण्यात आली नसून त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे तर दहावीची प्रात्याक्षिक परीक्षा ११ फेब्रुवारी ते २८ मार्च आणि लेखी परीक्षेला २ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. दहावीच्या प्रात्याक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षासंदर्भातील साहित्य वाटपाला ८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. शिक्षण मंडळाकडून सर्व शाळांना पत्र पाठविण्यात आले आहे, मात्र कुठल्याही शिक्षण संस्था आणि मुख्याध्यापकांनी शिक्षण मंडळातून साहित्य घेऊ नये, असा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतला आहे. या संदर्भात महामंडळाचे उपाध्यक्ष, माजी मंत्री विनोद गुडधे- पाटील यांच्या प्रमुख उपस्थित नुकतीच बैठक झाली असून, त्यात कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्य़ातील बहुतेक शाळांनी शिक्षण मंडळाला त्या संदर्भात कळविले आहे.
बारावी आणि दहावीच्या परीक्षेला शिक्षण संस्थांच्या इमारती उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत, शिवाय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परीक्षा घेणार नसल्यामुळे शिक्षण मंडळासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्य सरकारने या संदर्भात महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, मात्र त्यातून काहीच निष्पन्न न झाल्यामुळे परीक्षांवरचा बहिष्कार कायम राहणार असून, दहावी परीक्षेचे साहित्यही स्वीकारणार नाही, असे महामंडळाचे सहकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी सांगितले. दहावी परीक्षेसंबंधी असलेले साहित्य मात्र स्वीकारण्यात येणार नाही, असा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
बारावीच्या परीक्षांचे साहित्य वाटप जानेवारीमध्ये करण्यात आले असून, प्रात्याक्षिक परीक्षा सुरू झाल्याचा दावा नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चंद्रमणी बोरकर यांनी केला आहे. दहावीचे साहित्य वाटप ८ फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे.
शिक्षण संस्था महामंडळाने साहित्य न स्वीकारण्याचा निर्णय घेतला असला तरी त्या संदर्भात कुठल्याही संस्थांकडून पत्रव्यवहार करण्यात आला नाही. मंडळाने सर्व शाळांना साहित्य घेऊन जावे, असे निर्देश दिले आहे, असेही बोरकर म्हणाले.
‘दहावी परीक्षेचे साहित्यही स्वीकारू नका’
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू होणाऱ्या बारावी आणि दहावीच्या प्रात्याक्षिक आणि लेखी परीक्षांवर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा बहिष्कार कायम असताना ८ फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षासंबंधी शिक्षण मंडळातून वितरित केले जाणारे साहित्य शिक्षण संस्था व मुख्याध्यापकांनी स्वीकारू नये,
First published on: 07-02-2013 at 03:28 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont accept ssc exam sahitya