सध्याच्या काळात कवितेविषयी आंतरिक भान राहिले नाही. जगणं खरं केल्याशिवाय कवी होता येणार नाही. म्हणून नव्या पिढीच्या कवींनी खोलवर रुजून कविता करावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ कवी प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी व्यक्त केली.
प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांचा रविवारी अमृत महोत्सवी सोहळा मोठय़ा उत्साहात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री डी. पी. सावंत, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले, कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, उपमहापौर आनंद चव्हाण, डॉ. जगदीश कदम, बालाजी इबितदार, स्वागताध्यक्ष मारोती वाडेकर, केशव घोणसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना लक्ष्मीकांत तांबोळी म्हणाले, की कविता ही मनाला आनंद देणारी असावी. कोणाचाही द्वेष न करता आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी असावी. काळ अनंत आहे, पृथ्वी विशाल आहे. तोपर्यंत कविता आहे. अलीकडच्या काळात कवितेविषयी आंतरिक भान राहिले नाही. कविता माझा श्वास आहे. जन्मासोबत श्वास आला आणि श्वासासोबतच कविता राहील. नव्या पिढीच्या कवींनी पान-फुले मोजणे सोडून झाडासारखे वाढले पाहिजे. झाडासारखे वाढताना जमिनीत खोलखोल रुजले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  
ते म्हणाले, कवितेच्या व्याख्या अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे केल्या आहेत. पण मी ते धाडस करणार नाही. बुद्धीला प्रवृत्त करणारे व हृदय भेदणारे साहित्य म्हणजे कविता. स्वत:तल्या विकृती, प्रवृत्ती शोधत निघतो तो खरा कवी. अंत:करण सोलून काढून ठेवले तरच कविता निर्माण होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मर्ढेकर आदी कवींची थोरवी गात त्यांच्याच खांद्यावर मी उभा असल्याचे सांगताना तांबोळी भारावून गेले होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी मराठवाडय़ाच्या मातीची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून देण्याची ताकद नरहर कुरुंदकरांनंतर तांबोळी यांच्यात आहे. नरहर कुरुंदकर हे प्रतिभावंत साहित्यिक होते. संपूर्ण राज्यातल्या साहित्य वर्तुळात त्यांचा दबदबा आहे. पारंपरिक, पुरोगामी आणि प्रतिगामी साहित्यिकांच्या विचारांना नरहर कुरुंदकरांनी छेद दिला होता. तोच वारसा लक्ष्मीकांत तांबोळी चालवत आहेत. तांबोळी यांच्या कवितांमधून, लेखनातून त्या-त्या परिसरातील व्यक्तींच्या प्रतिभांची ओळख होते. हे एक संदर्भच असतात.
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी आपल्या भाषणात प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी लिहिणाऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे सांगून त्यांचे घर आमच्यासाठी ग्रंथालयच होते. विद्यार्थ्यांच्या मनातील सुप्तगुणांना चालना देऊन विकसित करणारे ते शिक्षक आहेत, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, पालकमंत्री डी. पी. सावंत, जगदीश कदम यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रारंभी सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘या मातीचा, पुण्याईचा टिळा कपाळी लावू, जोवर आहे गोदामाई तोवर गाणे गाऊ’ हे तांबोळी सरांनी लिहिलेले गीत मंजिषा देशपांडे व प्रमोद देशपांडे यांच्या संचाने सादर केले. व्यंकटेश चौधरी यांनी शब्दांकन केलेल्या मानपत्राचे वाचन डॉ. दीपक कासराळीकर यांनी केले. याच कार्यक्रमात भवभूती पुरस्कार औरंगाबादच्या मंगेश काळे यांना प्रदान करण्यात आला. तसेच प्रा. तांबोळी यांच्या ‘जन्मझुला’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन कुमार केतकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाला नांदेडकरांनी मोठी गर्दी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा