पैसा व प्रसिद्धीच्या मागे न लागता विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या मागे लागावे, त्याचबरोबर पालकांनी मुलांवर बंधने लादू नयेत. मुलांमध्ये कुतूहल निर्माण केले पाहिजे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीतील संगणकतज्ज्ञ व लेखक अच्युत गोडबोले यांनी रविवारी येथे केले.
अभियंता दिनानिमित्त कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी (दि. ६) जिल्हा परिषद अभियंता संघटना, आर्किटेक इंजिनियर सर्व्हेअर्स असोसिएशन व तांत्रिक सेवा पुरवठादार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गोडबोले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार चक्रधर दळवी, प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर, प्राचार्य डॉ. बी. यू. जाधव आदींची उपस्थिती होती.
‘मी असा घडलो’ या विषयावर बोलताना गोडबोले यांनी आपला बालपणापासूनचा प्रवास उलगडून सांगितला. भारतरत्न पंडित भिमसेन जोशी, कुमार गंधर्व यांच्या काव्यमफिली बालपणी घरी होत असल्याने आणि त्यांचा लाभलेला सहवास यातून आपण बरेच काही शिकलो. साहित्य, चित्रकला, गायन अशा विविध कला माणसांना घडवत असतात. कलेला कमी लेखू नका, असे आवाहन त्यांनी केले. लहानपणी घरामध्ये असलेल्या मोकळ्या वातावरणामुळे आपल्यात प्रत्येक गोष्टीचे कुतूहल निर्माण झाले. या कुतूहलातून नवीन काही तरी करण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे प्रत्येक पालकांनी मुलांवर जास्त बंधने लादू नका. भारतीय तत्त्वज्ञानात मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन लपलेला आहे, असे सांगत ज्ञानाच्या बाबतीत स्पर्धा ठेवा, असे गोडबोले म्हणाले. आय.आय.टी.मधील दिवस मंतरलेले होते. या काळात अनेक दिग्गजांचा सहवास लाभला. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांच्यासोबत मफिलीत बसण्याची संधी मिळाली. शिक्षणानंतर सामाजिक क्षेत्रात पाऊल ठेवले. नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या प्रश्नासाठी लढताना दहा दिवसांचा तुरुंगवास भोगला. तुरुंगात असणाऱ्या कैद्यांच्या मुलाखती घेतल्या, असे अनेक अनुभव गोडबोले यांनी यावेळी सांगितले. मुलांच्या आजारपणानंतर एका क्षणात स्वतला बदलून नवीन आयुष्य सुरू केले. तिथूनच लेखनास सुरुवात केली. याच दरम्यान तीन कोटी रुपये वेतनाच्या दोन नोकऱ्याही नाकारल्याचे गोडबोले यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी खूप वाचावे, व्यसनापासून दूर राहत स्वतला घडवावे, असे आवाहन शेवटी गोडबोले यांनी केले.

Story img Loader