विनोदाच्या नावाखाली काहीही करायचे हा शिरस्ताच अनेकोंच्या अंगवळणी पडला आहे. केवळ विनोदावर आधारित रिअॅलिटी शोज नव्हे तर गाण्याचे, नृत्याचे सगळेच रिअॅलिटी शोज आज विनोदी होऊन बसले आहेत, अशी टीका विनोदी अभिनेता म्हणून लौकिक मिळवलेल्या शेखर सुमन यांनी केली आहे. कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकांची जागा ही सन्मानाची असते. तो गुरू च्या, मार्गदर्शकाच्या भूमिकेने तिथे बसलेला असतो. तरीही केवळ शोमध्ये विनोदाची फोडणी असावी म्हणून परीक्षकांची टिंगलटवाळी केली जाते. चेतन भगतसारख्या नावाजलेल्या लेखकाची जी शोभा केली गेली ती वाईट होती. पण, खुद्द चेतन भगतने हा अपमान सहन का केला, असा सवालही शेखर सुमन यांनी केला.
विनोदी मनोरंजनासाठी समर्पित असलेल्या ‘सब टीव्ही’वर नवीन रिअॅलिटी शो दाखल होत असून आत्तापर्यंत विनोदी कौटुंबिक मालिकांमध्ये रमलेल्या वाहिनीने या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘कॉमेडी सुपरस्टार’ या त्यांच्या आगामी शोमध्ये अभिनेता, दिग्दर्शक शेखर सुमन परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘सब टीव्ही’ने विनोदी मालिकांच्या बाबतीत आपले वेगळेपण कायम राखले आहे. हसवण्यासाठी द्वयर्थी संवादांची पेरणी करणे, वेडेवाकडे अंगविक्षेप करणे याला विनोद म्हणत नाहीत. ‘कॉमेडी सुपरस्टार’ सारख्या रिअॅलिटी शोची संकल्पना मांडताना वाहिनीने अशा गोष्टींवर काट मारली आहे. त्यामुळे परीक्षक म्हणून काम करण्याचे समाधान आणि स्वातंत्र्य या शोसाठी वाहिनीने दिले आणि म्हणूनच हा शो वेगळा ठरेल, अशी अपेक्षा शेखर सुमन यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना व्यक्त केली. रिअॅलटी शोमध्ये परीक्षकाची जागा ही गुरूचीच असते. केवळ शो चालावा म्हणून तुम्ही परीक्षकांचीच टर उडवता हे योग्य नाही. पण, अपमान करणाऱ्यांबरोबरच तो सहन करणाराही तितकाच गुन्हेगार असतो. चेतन भगतसारख्या हुशार आणि नामवंत लेखकाने हा अपमान सहन करण्याची गरज काय? यातून समाजात चुकीचा संदेश जातो आहे, याचेही भान या मंडळींना नाही, अशा कडक शब्दांत शेखर सुमन यांनी रिअॅलिटी शोजमध्ये सुरू असलेल्या थिल्लरपणावर टीका केली.
‘कॉमेडी सुपरस्टार’मध्ये स्पर्धकांना केवळ विनोदी अॅक्ट करून चालणार नाही. एखादा प्रसंग त्यांना स्पर्धेसाठी दिल्यानंतर प्रसंगी गाणे गाऊन, नाचून तर कधी नुसतेच अभिनयातून त्यांना तो जिवंत करायचा आहे. यासाठी त्यांच्या संहितेपासून ते त्यांचा अभिनय, त्यांचे व्यक्तिमत्त्व या सगळ्याचा कस या शोमध्ये लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शोसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले बरेचसे स्पर्धक हे गावखेडय़ातून आणि गरीब परिस्थितीतून आलेले आहेत. त्यांच्यासाठी हा रिअॅलिटी शो म्हणजे एक मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे. अशा स्पर्धकांना स्पर्धेपूर्वी त्यांची तयारी करून घेणे, त्यांना घडवणे आणि मग प्रत्यक्ष स्पर्धेतील त्यांचे सादरीकरण अनुभवणे, असा मोठा प्रवास या शोमुळे घडला असल्याचे त्यांनी सांगितले.
चेतन भगतने अपमान सहन का केला?
विनोदाच्या नावाखाली काहीही करायचे हा शिरस्ताच अनेकोंच्या अंगवळणी पडला आहे...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-08-2015 at 12:46 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont crack joke on reality show judge