अतुल कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत
आजच्या शिक्षण पद्धतीत उत्तम विद्यार्थी शोधले जातात. वास्तविक, विद्यार्थ्यांमधील उत्तम ते शोधणारी शिक्षण पद्धती अस्तित्वात आली पाहिजे, असे मत चित्रपट अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेत कुलकर्णी यांची ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात शहराच्या विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. आजचा विद्यार्थी हा स्वकेंद्रित व स्वार्थी बनतो आहे. त्याचे कारण त्याला योग्य दिशेचे शिक्षण मिळत नाही, असे कुलकर्णी यांनी सांगितले. अभियांत्रिकीचे शिक्षण सोडून अभिनयाकडे कसे वळलो याची माहिती देताना ते म्हणाले, की मी बारावी विज्ञान शाखेत दोनदा अनुत्तीर्ण झालो. त्यानंतर घरच्यांना मला माझ्या पद्धतीने शिकू द्या, असे सांगितले. पाच वर्षे अनुत्तीर्ण झाल्यानंतर मला ते धाडस आले. सोलापुरात बी.ए.ला प्रवेश घेतला व त्यानंतर खालून पहिल्याऐवजी ‘वरून पहिला’ आलो. बी.ए. करतानाच सोलापुरात ‘नाटय़ आराधना’ या संस्थेत विविध नाटकांतून काम केले. त्यातून नाटय़ अभिनेता अशी ओळख झाली. त्यानंतर नवी दिल्ली येथील विश्व नाटय़विद्यालयात प्रवेश घेतला. संपूर्ण देशभरातून १०० विद्यार्थी निवडून त्यातील २० विद्यार्थ्यांना नाटय़ विद्यालयात प्रवेश दिला जातो. त्यात पहिल्यांदाच आपल्याला प्रवेश मिळाला.
कल असणे व प्रावीण्य मिळविणे या भिन्न बाबी आहेत. नाटय़ विद्यालयात प्रावीण्य मिळविण्यासाठी नेमके काय केले पाहिजे? याचे शिक्षण दिले जाते. सन १९९५मध्ये वयाच्या पंचविशीतच ‘गांधी विरुद्ध गांधी’ हे नाटक करण्याची संधी मिळाली. गांधीजींची भूमिका करण्यासाठी त्या काळात प्रचंड वाचन केले. अनेक फोटो पाहिले. गांधीजींबद्दलचे सर्व गैरसमज दूर झाले. त्यांना समजून घेतल्यामुळे ती भूमिका वठवता आली. त्यानंतर कमल हासन यांच्या ‘हे राम’ चित्रपटात भूमिका मिळाली. ज्यात विरुद्ध टोकाचे काम होते. त्यामुळेही गांधीजी आपल्याला अधिक समजले.
एखादी भूमिका सर्वाधिक अवघड आहे म्हणून ती स्वीकारायला लोक घाबरतात. आपण मात्र तशीच भूमिका आव्हान म्हणून स्वीकारायची या पद्धतीने काम करायला लागलो. त्याचा आपल्याला चांगला उपयोग झाला. आपल्या भोवतालच्या स्थितीबद्दल इतरांना दोष देणे सोपे असते. ज्यामुळे स्वत:ला काही करायचेच नसते. अशा दोष देण्यातून स्वत:मध्ये व आपल्या भोवतालच्या वातावरणात केवळ निराशा अन् निराशाच पसरते. हे चित्र बदलण्यासाठी कोणत्याही बाबतीत सुरुवातीला स्वत:ला जबाबदार धरायला शिकले पाहिजे. ज्यातून स्वत:त बदल होतील व हळूहळू स्थितीत बदल होईल.
देश घडवायचा असेल त्यासाठी जास्त काही करण्यापेक्षा सुरुवातीला स्वत:ला घडवा व त्यानंतर आपोआप देश घडेल. ठाणे, नंदूरबार, धुळे, नाशिक, जालना अशा आदिवासी भागातील विद्यार्थ्यांत शैक्षणिक काम करणाऱ्या ‘क्वेष्ट’ या त्यांच्या स्वयंसेवी संस्थेबद्दल माहिती सांगताना ते म्हणाले, की समाजात बदल घडण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे राजकारण. ते आपल्याला शक्य नसल्यामुळे दुसरे प्राधान्य शिक्षणाला दिले. शाळा न काढता आहे त्या शाळेत पुस्तक बदलणे, शिक्षकांचे प्रशिक्षण घेणे असे उपक्रम हाती घेतले. या कामासाठी चांगले सहकारी मिळाले व त्यातून एक आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा