वारजे पोलीस ठाण्याला लागणाऱ्या जागेसाठी महानगरपालिका पाच कोटी रुपयांची मागणी करत असेल, तर त्यांना अतिक्रमण कारवाईच्या वेळी पोलीस बंदोबस्त पुरवू नका, अशा स्पष्ट शब्दांत गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी पोलीस आयुक्तांना सांगितले.
पुणे पोलीस आयुक्तालयातील खडक पोलीस ठाण्यात पहिला पथदर्शी सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, अपर पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, आमदार मोहन जोशी, उपायुक्त मकरंद रानडे आदी उपस्थित होते. आमदार जोशी यांच्या निधीतून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून दोन किलो व्ॉट वीज मिळणार आहे. या प्रकल्पाची उभारणी हेरंभ इंजिनियर्स या कंपनीने केली आहे.  या पोलीस ठाण्यातील संगणक यंत्रणा व विजेचे दिवे हे पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणार आहेत. खडक पोलीस ठाणे हे सौरऊर्जेवर चालणारे राज्यातील पहिले पोलीस ठाणे ठरले आहे.
पाटील म्हणाले की, शासकीय जागाही एका शासकीय संस्थेला देताना ती मोफत दिली जाते. पुणे महानगरपालिका जागेसाठी पाच कोटी रुपये मागत असेल तर त्यांच्या कामात मदत करू नका, असे स्पष्ट शब्दांत पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना सांगितले. या जागेबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. वारजे पोलीस ठाण्याला लागणारी जागा मिळवून देऊ, असे आश्वासन पाटील यांनी दिले.   

Story img Loader