ऊस दर प्रश्नावर गतवर्षांपेक्षा यंदाच्या वर्षी गळीत हंगामात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हाती घेतलेल्या आंदोलनाची तीव्रता तुलनेने कमी असली, तरी पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी साखरपट्टय़ात बंदोबस्त कायम ठेवला आहे. साखर कारखान्यांच्या परिसरात जमावबंदीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. ऊस आंदोलन तीव्र झाले तर गोळीबार किंवा अन्य कठोर पावले न उचलता लाठीमार, अश्रुधूर अशा स्वरूपात परिस्थिती हाताळण्याचे आदेश गृहखात्याने दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्य़ात २९ साखर कारखाने असून त्यापकी सद्या २५ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. मागील सलग दोन वर्षांच्या दुष्काळामुळे यंदाच्या गळीत हंगामासाठी जिल्हयात केवळ ८५ हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस उपलब्ध आहे. गतवर्षी ऊस दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्य़ात आक्रमक पवित्रा घेऊन तीव्र आंदोलन छेडले होते. त्या वेळी आंदोलनाचा केंद्रिबदू माढा व पंढरपुरात होता. विशेषत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपुरात विठ्ठलाला साकडे घालून पंढरपूर ते बारामतीपर्यंत पदयात्रा सुरू केली होती. गतवर्षी झालेल्या या आंदोलनात ऊस वाहतुकीची वाहने जाळणे, टायर फोडणे, चाकांची हवा सोडणे, साखर कारखान्यांसह विभागीय कार्यालयावर हल्ला करून मालमत्तेची नासधूस करणे, एसटी बसेसवर दगडफेक करून जाळपोळ करणे अशा स्वरूपाच्या ३८ गुन्हयांची नोंद पोलिसात झाली होती.
गतवर्षीच्या तुलनेने यंदाच्या गळीत हंगामात ऊस दर प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला धार चढली नसल्याचे दिसून येते. १५ दिवसांपासून माढा, पंढरपूर, माळशिरस, करमाळा तसेच बार्शी व मंगळवेढय़ाच्या काही भागात आंदोलन होत आहे. यात अनुचित प्रकारांची संख्या तुलनेने कमी असून आतापर्यंत पोलिसात ११ गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, साखर कारखान्यांच्या परिसरात जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी फौजदारी दंड संहिता कलम १४४ अनुसार जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. या कायद्याचा भंग झाल्यास संबंधित आंदोलकांविरुद्ध दखलपात्र गुन्हे दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. आंदोलन हाताळण्यासाठी साखरपट्टय़ात राज्य राखीव पोलिसांच्या दोन तुकडय़ांसह १५० गृहरक्षक जवान, १५० नवशिक्षित पोलीस कर्मचारी, ५० महिला पोलीस कर्मचारी या प्रमाणे जादा पोलीस मनुष्यबळ तनात करण्यात आले आहे. मात्र हे ऊस आंदोलन अधिक तीव्र झाल्यास परिस्थिती पाहून कारवाई करण्याच्या सूचना गृहविभागाने दिल्या आहेत. आंदोलक िहसक होऊन त्यातून एसटी बसेस जाळण्यात आल्या व त्यात सामान्य प्रवाशांचे प्राण धोक्यात येत असतील, तरच गोळीबारासारखी कठोर पावले उचलावीत. तुलनेने कमी िहसा होत असेल, तर गोळीबार न करता परिस्थिती पाहून लाठीमार किंवा अश्रुधुराचा अवलंब करावा, अशा सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याचे सांगण्यात आले.