जालना लोकसभा आपल्याकडेच राहणार, याबद्दल जिल्ह्य़ातील काँग्रेसची नेतेमंडळी निश्चिंत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र या प्रश्नावरून चलबिचल आहे.
सलग पाच वेळा या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे या वेळी ही जागा राष्ट्रवादीस सोडण्यात यावी, असा या पक्षाच्या जिल्ह्य़ातील प्रमुख पुढाऱ्यांचा आग्रह आहे. मागील एक-दीड वर्षांपासून जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीने या जागेसाठी प्रयत्न सुरू केले. ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे यांना पक्षाकडून ही निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या प्रदेश पातळीवरील महत्त्वाच्या व पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेत स्थान असणाऱ्या नेत्याने मंत्री राजेश टोपे उमेदवारीसाठी इच्छुक असतील, तर राष्ट्रवादी या जागेसाठी आग्रह धरील, असे स्पष्ट केल्याचे वृत्त आहे.
राष्ट्रवादीच्या प्रदेश पातळीवरील जबाबदार पदाधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना या वृत्तास दुजोरा दिला. परंतु असे असले, तरी राष्ट्रवादीने अजून या जागेवरील आग्रह सोडला नसल्याचे सांगण्यात येते. माजी आमदार व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अरविंद चव्हाण यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. या संदर्भात विचारले असता ‘राष्ट्रवादीने आघाडीत जालना येथील जागा मागितली असून अजून या संदर्भात पक्षपातळीवर कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही,’ असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. साडेआठ हजार मतांनी पराभूत झालेले मागील वेळचे उमेदवार कल्याण काळे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे या दोघांची नावे चर्चेत आहेत. मतदारसंघात सहापैकी पाच आमदार आघाडीचे आहेत. चंद्रकांत दानवे (भोकरदन) व वाघचौरे (पैठण) हे दोन आमदार राष्ट्रवादीचे आहेत. कैलास गोरंटय़ाल (जालना), अब्दुल सत्तार (सिल्लोड) आणि कल्याण काळे (औरंगाबाद पूर्व) हे तीन आमदार काँग्रेसचे आहेत. त्यामुळे पक्षाची उमेदवारी ठरविण्यात या तिघांचे महत्त्व राहणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा