देशाच्या कानाकोपऱ्यात दर्जेदार कार्यक्रम घेऊन जाणाऱ्या ‘दूरदर्शन’ ही सरकारी वाहिनी आता खासगी वाहिन्यांना टक्कर देण्यास सज्ज होत असून त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकारही करण्याचे तिने ठरवले आहे. ‘दूरदर्शन’ने आता थेट ‘हाय डेफिनेशन’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठी उडी घेण्याचे ठरविले आहे. यासाठी आता सर्व केंद्रांवरील तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली असून काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर एच्डी स्वरूपातील ‘दूरदर्शन’ पाहण्याची संधी मिळणार आहे.
१५ सप्टेंबर १९५९ रोजी दिल्लीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या ‘दूरदर्शन’चा प्रसार नव्वदीच्या दशकापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात झाला. सध्या देशातील ९० टक्क्यांहून अधिक जनता ‘दूरदर्शन’ पाहू शकते. केबल तसेच खासगी वाहिन्यांचा प्रसार झाल्यानंतर ‘दूरदर्शन’ काहीसे मागे पडले असले, तरी आता अद्ययावत तंत्रज्ञानाच्या जोरावर या स्पर्धेत उतरण्याची तयारी ‘दूरदर्शन’ने केली आहे. याचाच एक टप्पा म्हणून लवकरच ते ‘हाय डेफिनेशन’ स्वरूपात अवतरत आहे.
यासाठी प्रमुख केंद्रांमध्ये एचडी तंत्रज्ञानाला साजेसे स्टुडिओ, पारेषक (ट्रान्समीटर) आणि कॅमेरे यांची तयारी सध्या सुरू आहे. त्याचप्रमाणे केबल चालकांकडे एचडीसाठी आवश्यक ग्राहक आकाशक (रिसिव्हर अ‍ॅण्टेना) असल्याचीही खातरजमा केली जात आहे. मुंबई केंद्रांतील तंत्रज्ञांना ११ ऑक्टोबरपासूनच एचडी कॅमेरा हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यासही सुरुवात झाल्याची माहिती एका ज्येष्ठ तंत्रनिर्देशकाने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
खेडोपाडय़ांत विखुरलेल्या दूरदर्शनच्या प्रेक्षकाला एचडी तंत्रज्ञानाला पूरक ठरतील, असे दूरचित्रवाणी संच घेणे परवडणारे नाही. त्यामुळे अशा प्रेक्षकांसाठी ‘दूरदर्शन’वरील कार्यक्रम एचडीबरोबरच मूळ स्वरूपातही प्रसारित केले जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा