मध्य नागपुरातील चिटणीस पार्कवर इनडोअर स्टेडियमचे बांधकाम करण्यात येणार असून या ठिकाणी डबल बेसमेंट पार्किंगची व्यवस्था राहणार आहे. त्यामुळे मध्य नागपुरात भेडसावत असलेली पार्किगची समस्या बऱ्याच अंशी सुटणार आहे. महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत १३ कोटी ७९ लाख ३८ हजार ८९३ रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
चिटणीस पार्कमधील इनडोअर स्टेडियमच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असून येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. ज्या भागात सध्या व्यासपीठ आहे त्या ठिकाणी प्रवेशद्वार करण्यात येणार असून श्याम टॉकीजच्या बाजूने पार्किंगची व्यवस्था राहणार आहे. त्याच भागाने लोकांना बाहेर पडता येईल. स्टेडियममधील सध्याची असलेली आसन व्यवस्था तशीच ठेवण्यात येणार असून केवळ मैदानावरच बांधकाम करण्यात येणार आहे. मैदानावर काम सुरू करण्यात येणार असल्यामुळे किमान दोन महिने कुठल्याही कार्यक्रमांना ते देता येणार नाही. चिटणीस पार्कमध्ये असलेली जुनी भारत व्यायाम शाळा हटविली जाणार नाही. व्यायाम शाळेच्या समोर व्यासपीठ करण्यात येणार आहे. पार्किंगमध्ये ४०० कार आणि एक हजार स्कूटर राहतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या मार्केटमधील व्यापारांसाठी पार्किंगची सुविधा होईल.
या प्रकल्पासाठी ८.६७ कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून मे. संधी इंजिनिअर्स याची निवड करण्यात आली आहे.

Story img Loader