बापलेकात झालेल्या वादाचे पर्यवसान इतक्या थराला पोहोचले की, शेवटी संतापलेल्या मुलाने आपल्या बापाचा व लहान भावाचा भीषण खून करण्यात झाले. हिवरखेड या छोटय़ाशा गावात काल , सोमवारी घडलेल्या प्रकाराने सारे गाव हादरले आहे. आपल्या पित्यावर व भावावर सुरीने सपासप वार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळवून पोराने त्यांना ठार केल्याची ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारेकरी ऐयाज याच्यावर नोंदविला आहे.
हिवरखेडमधील आझाद (६२) यांना ११अपत्ये आहेत. कुटुंब मोठे असल्याने सारे वेगवेगळे राहतात. यातील मुलगा ऐयाज व आझाद यांचे बरेच दिवसांपासून पटत नव्हते. गावातील आठवडी बाजाराजवळ आझाद राहतात. आज त्यांचा मुलगा ऐयाज तेथे आला. वडील आझाद दारात म्हैस बांधत असताना तो आला व बाप-लेकात जोरदार वाद सुरू झाला. या वादाचा परिणाम असा झाला की, शेवटी संतापलेल्या ऐयाजने त्याचे वडील आझाद यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. सुरीने वार करून ऐयाजने बापाला ठार केले. त्या दरम्यान त्याचा भाऊ फैयाज हा आला असता ऐयाजने त्याच सुरीचे वार फैयाजवरही करून त्यालाही ठार मारले. या दुहेरी हत्याकांडाने हिवरखेड हादरले आहे. ऐयाजने केलेले वार इतके भयंकर होते की, त्यात हे बापलेक रक्ताच्या थारोळ्यातच गतप्राण झाले. हा सर्व प्रकार सुरू असता काही लोकांनी मध्ये येऊन हा वाद आवरता घेण्याचा प्रयत्न केला, पण ऐयाजने त्यांनाही ठार मारण्याची भीती दाखवली. तो त्यांच्याही अंगावर धावून गेला. त्याचा तो आवेश पाहून नंतर कोणीच मध्ये पडले नाही.
या घटनेनंतर अत्यंत गंभीर अवस्थेतील त्या बापलेकास अकोला येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यांची प्रकृ ती पाहून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते दोघेही मरण पावल्याची वार्ता गावात पसरताच हिवरखेडमध्ये खळबळ उडाली, तसेच तणावही निर्माण झाला. ठाणेदार अनंत पुणपात्रे यांनी तात्काळ मारेकरी ऐयाज याला अटक केली व त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण हिवरखेड थरारले आहे.