खासगी बसच्या बेकायदेशीर
वाहतुकीवरील कारवाईचा ठाणेकरांना फटका
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या बससेवेचा बोजवारा आणि मुजोर रिक्षाचालकांच्या मनमानीला कंटाळून घोडबंदर ते रेल्वेस्थानक मार्गावरील ‘खासगी’ बस वाहतुकीचा पर्याय स्वीकारणाऱ्या हजारो प्रवाशांना सध्या प्रादेशिक परिवहन विभागाने अवैध वाहतुकीविरोधात सुरू केलेल्या कारवाईचा फटका बसू लागला आहे. किफायतशीर बसभाडे आणि पुरेशा फे ऱ्या यामुळे घोडबंदर मार्गावरील प्रवाशांनी या अनधिकृत सार्वजनिक वाहतुकीचा हा खासगी मार्ग स्वीकारला. मात्र, आरटीओच्या मोहिमेमुळे गेल्या आठवडाभरापासून ही बससेवा बंद पडल्याने ठाणेकर प्रवाशांची अवस्था ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी झाली आहे.
खासगी बसमालकांकडून केली जाणारी ही वाहतूक अनधिकृत असल्याने सध्या अशा बसेसवर आर.टी.ओ. कारवाई करीत आहे. या कारवाईमुळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर काही ठिकाणी वाहतूक कोंडी कमी झाली असली तरी प्रवाशांची मात्र गैरसोय होऊ लागली आहे. घोडबंदर रोड परिसरातील शेकडो प्रवासी या अनधिकृत वाहतुकीवर अवलंबून असतात. या मार्गावर उपलब्ध असलेल्या वाहतुकीच्या पर्यायांमध्ये सर्वात स्वस्त भाडे या बसगाडय़ांचे आहे. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने घोडबंदर मार्गावरील वेगवेगळ्या स्थानकांवर प्रवासी सेवा वाढवावी, अशी मागणी प्रवासी संघटनांमार्फत वेळोवेळी करण्यात आली आहे.सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेत या मार्गावर टीएमटीच्या बसेस पुरेशा प्रमाणात नसतात, अशी प्रवाशांची ओरड आहे. रिक्षा चालकांच्या मुजोरीमुळे तर प्रवासी मेटाकुटीला आलेले आहेत. या मुजोर रिक्षाचालकांवर आरटीओच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही एन. के. पाटील यांचा परिवहन विभाग भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात प्रभावी कारवाई करताना दिसत नाही.या पाश्र्वभूमीवर कमी वेळेत निश्चित ठिकाणी पोहोचता येत असल्याने वाहतुकीच्या अनधिकृत अशा खासगी पर्यायाला हजारो ठाणेकरांनी पसंती दिली आहे. दिवसाला १५ हजार प्रवाशांची ने-आण या खासगी बसमधून होते. घोडबंदर मार्गावर असलेल्या काही गृहसंकुलातील रहिवासी तसेच खासगी कंपन्यांचे कर्मचारी यांची वाहतूक करण्याची परवानगी काही खासगी बसेसना आहे. परंतु, सरसकट अशी परवानगी देण्यात आलेली नाही. बरेच बसमालक फक्त घोडबंदर रोड ते कासारवडवली या मार्गावर प्रवाशांची ने-आण करण्याचा व्यवसाय करतात. बसमालकांकडून केली जाणारी ही वाहतूक अनधिकृत असल्याने आरटीओ या बसेसवर सध्या कारवाई करत आहे. ही कारवाई योग्य असली तरी प्रवाशांची मात्र गैरसोय होऊ लागली आहे. कारवाईसाठी बस जप्त करणे गरजेचे असते. या वेळी काही अधिकारी बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवून जप्तीची कारवाई करतात. अशा वेळी मध्येच उतरावे लागत असल्याने पुढील प्रवास कसा करायचा हा मोठा प्रश्न प्रवाशांना पडू लागला आहे.