धरणांमधून पाणी सोडताना नियोजनाची गरज
जून महिन्यातील दमदार पावसामुळे विदर्भातील जलाशयांमध्ये पाच वर्षांतील सरासरीपेक्षा दुप्पट पाणी साठले असून, सर्व धरणांमधील जलसाठा ४० टक्क्यांवर पोहोचला आहे. लघु प्रकल्पांमध्येही समाधानकारक जलसंचय झाला आहे. अमरावती विभागातील ४१ लघु प्रकल्प तुडुंब भरले आहेत. विदर्भातील दोन मोठय़ा प्रकल्पांनीही पूर्ण संचय पातळी गाठली आहे. धरणांमधील पाणी सोडताना नियोजनाची गरज व्यक्त केली जात आहे.
विदर्भात मोठय़ा प्रकल्पांमध्ये जूनअखेरीस सर्वसाधारणपणे ८५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होतो, पण आतापर्यंत दुपटीहून अधिक म्हणजे १८०५ दलघमी पाणी अडवले गेले आहे. पूस आणि पोथरा प्रकल्प तर तुडुंब भरले आहेत. अशीच स्थिती मध्यम आणि लघु प्रकल्पांची आहे. अमरावती विभागात ९ मोठे प्रकल्प आहेत. पाच वर्षांची सरासरी २८४ दलघमी आहे. २ जुलैअखेर या प्रकल्पांमध्ये ५६७ दलघमी जलसाठा झाला आहे.
हा ३७ टक्केआहे. नागपूर विभागातील १६ मोठय़ा प्रकल्पांची सरासरी ५५३ दलघमी असताना सद्यस्थितीत या प्रकल्पांमध्ये १२३८ दलघमी म्हणजे ४३ टक्केपाणी साठवले गेले आहे. धरणांमध्ये पाण्याची पातळी जूनमध्येच दुपटीने वाढल्याने जलसंपदा विभागासमोर आता पाण्याचे वेळीच नियोजन करण्याची पाळी आली आहे. धरणांमधून अतिरिक्त पाणी सोडले जात आहे, पण पुढल्या दोन महिन्यांत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास पाण्याचा साठा पाहून धरणांमधून पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. अशा स्थितीत अनेक गावांना पुराचा धोकादेखील उद्भवू शकतो. पूर्वानुभव लक्षात घेता पूरपरिस्थितीत महसूल यंत्रणा आणि जलसंपदा विभागांमध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.
अमरावती विभागातील २३ मध्यम प्रकल्पांमध्ये २६८ दलघमी ( ४१ टक्के), तर ३४२ लघु प्रकल्पांमध्ये ३७० दलघमी ( ४२ टक्के) पाणीसाठा आहे. सायखेडा आणि सोनल हे प्रकल्प तुडुंब भरले आहेत. सोनल प्रकल्पाचे दरवाजे १ सें.मी. उघडण्यात आले असून ०.३५ घनमीटर प्रतिसेंकद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. सायखेडा प्रकल्पात ९९ टक्केजलसाठा झाला आहे. या धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. अधरपूस प्रकल्प २४ टक्केभरला असला तरी सध्या या प्रकल्पाची दोन दारे २५ सें.मी.ने उघडण्यात आली असून, ४० घनमीटर प्रतिसेकंद पाणी धरणातून सोडले जात आहे. मोठय़ा प्रकल्पांपैकी पूस प्रकल्पातून २९.७३ घनमीटर प्रतिसेकंद, तर गोसीखुर्दमधून ८१ घनमीटर प्रतिसेकंद पाणी सोडण्यात येत आहे. नागपूर विभागातील ४० मध्यम प्रकल्पांचा पाच वर्षांतील सरासरी जलसाठा ६४ दलघमी आहे. सध्या २०१
दलघमी म्हणजे ३६ टक्केपाणीसाठा झाला आहे. काही प्रकल्पांमधून पाणी सोडण्याचे काम थांबवले गेले असले, तरी पुन्हा ही स्थिती येऊ शकते, असा अंदाज आहे. पावसाळ्याचे तीन महिने अजून शिल्लक आहेत. या महिन्यात पावसाने जोर दाखवल्यास जुलैमध्येच पूर्ण जलसंचय होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत अनेक धरणांमधून पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. धरणांमधून पाणी सोडल्यानंतर नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होतो. प्रत्येक गावात पूरपातळी रेषा आखून दिलेली आहे, पण अचानक महापुराच्या वेळी प्रशासनाचा गोंधळ उडतो. त्यासाठी वेळीच सावध राहून उपाययोजना करण्याची गरज जाणकारांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा