उल्हास नदीतील पाण्याची पातळी घटल्याने पाटबंधारे विभागाने लागू केलेल्या १५ टक्के पाणी कपातीचा दुहेरी फटका ठाणे तसेच कल्याण डोंबिवली या दोन शहरांना बसू लागला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही या दोन शहरांना पुरविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठय़ात कपात केल्याने या शहरांमधील नागरिकांना आता आठवडय़ातून दोन दिवस पाण्याशिवाय काढावे लागणार आहेत. उल्हास नदीवरील बारवी धरणातून औद्योगिक विकास महामंडळही पाणी उचलते. त्यामुळे पाटबंधारे विभागाची पाणी कपात लागू होताच औद्योगिक विकास महामंडळानेही आपल्या कोटय़ातील पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांना बारवी धरणातून पाण्याचा पुरवठा होतो. या धरणातून ठाणे, कल्याण डोंबिवली, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, स्टेम यासारखी वेगवेगळी प्राधिकरणे पाणी उपसतात. ठाणे शहरालाही वेगवेगळ्या स्रोतांमधून पाण्याचा पुरवठा होत असतो. भातसा धरणातून महापालिकेच्या स्वतच्या स्रोतामधून ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांना सुमारे २०० दक्षलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होत असतो. तसेच भिवंडी, मीरा-भाईंदर, ठाणे यासारख्या शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम कंपनीकडून १२७ दक्षलक्ष लिटर पाणी पुरवठा होता. याशिवाय औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रती लिटर आठ रुपये दराने ठाणे महापालिका १०० दक्षलक्ष लिटर इतके पाणी विकत घेते.
पाटबंधारे विभागाने पाणी कपातीचा निर्णय लागू करताच स्टेम कंपनीला पाणी कपात जाहीर करावी लागलीच शिवाय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही पाणी कपातीचा निर्णय जाहीर केला. याचा दुहेरी फटका ठाणे महापालिकेस बसला असून स्टेम कंपनीच्या पाणी कपातीमुळे आठवडय़ातील प्रत्येक बुधवारी शहरातील काही भागांमध्ये पाणी कपात करणाऱ्या महापालिकेस आता प्रत्येक शुक्रवारीही पाणी कपातीचा निर्णय घेणे भाग पडले आहे. स्टेम कंपनीकडून झालेल्या पाणी कपातीचा फटका भिवंडी, मीरा-भाईंदर यासारख्या शहरांनाही बसला आहे. ठाणे महापालिकेने स्वतच्या पाणी पुरवठा योजनेतून मिळणाऱ्या पाण्यातून कळवा-मुंब्रा तसेच ठाण्यातील काही महत्वाच्या भागांमध्ये पाण्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळणाऱ्या १०० दक्षलक्ष लिटर पाण्यातही कपात झाल्याने हे नियोजन सध्या गडबडले आहे.
ठाण्यासारखी नेमकी परिस्थिती कल्याण व डोंबिवली शहरातही निर्माण झाली आहे. येथील महापालिकेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दररोज १०० दक्षलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होता. औद्योगिक विकास महामंडळाने पाणी कपातीचा निर्णय घेतल्याने या शहरांतही आठवडय़ाच्या प्रत्येक मंगळवारी तसेच शुक्रवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कल्याण आणि डोंबिवली अशा दोन शहरांमधील अनेक भागांमध्ये आठवडय़ात दोन दिवस पाणी येणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
ठाणे महापालिका हद्दीत प्रत्येक शुक्रवारी घोडबंदर रोड, बाळकुम, वागळे इस्टेट, कोलशेत, विटावा, बेलापूर रोड, मुंब्रा, कौसा या भागात पाणी येणार नाही. या शिवाय पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे. आठवडय़ाच्या प्रत्येक बुधवारी घोडबंदर, बाळकुम, ढोकाळी या परिसराचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. या वेळापत्रकानुसार घोडबंदर तसेच बाळकुम भागात रहाणाऱ्या नागरिकांना या पाणी कपातीचा सर्वाधिक फटका बसेल हे स्पष्ट होऊ लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा