डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा संघर्ष तत्कालीन नेत्यांपैकी एकालाही करावा लागला नाही. देशाचे पारतंत्र्य व त्याचवेळी त्याच देशातील लोकांनी समाजबांधवांवर लादलेले हजारो वर्षांचे पारतंत्र्य याच्याविरोधात ते लढा देत होते. या संघर्षांतून त्यांनी स्वत:ला सिद्ध केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य या विषयावर प्रा. मोरे यांचे व्याख्यान झाले. डॉ. आंबेडकर यांच्या १२२व्या जयंतीनिमित्त आदी फाऊंडेशन व राजीव राजळे मित्रमंडळ यांच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नेते डी. एम. कांबळे, जि.प.च्या उपाध्यक्ष मोनिका राजळे, दीपलक्ष्मी म्हसे, मुळा कारखान्याचे संचालक अशोक गायकवाड, कवी लहू कानडे, किसनराव लोटके, डॉ. रावसाहेब अनभुले, मिठूभाई शेख, जि.प. सदस्य सचिन जगताप व अन्य पदाधिकारी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजीव राजळे होते.
महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक जडणघडणीचे अभ्यासक असलेल्या प्रा. मोरे यांनी विस्ताराने डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा धांडोळा घेतला. प्रचंड व्यासंग, त्यासाठी प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याची वृत्ती ही डॉ. आंबेडकरांची वैशिष्टय़े होती. अस्पृश्य समजल्या जाणा-या समाजाची उन्नती साधण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न म्हणजे वर्षांनुवर्षांच्या रूढीपरंपरा गदगदा हलवण्याचाच प्रकार होता. त्यांनी आपले सर्व शिक्षण समाजाच्या कारणी लावले. त्यांना तत्कालीन समाजाकडून त्रास झाला तसेच राजर्षी शाहू, सयाजीराव महाराज यांच्याकडून सहकार्यही मिळाले असे मोरे यांनी सांगितले.
दलित समाजाच्या उत्साहाला विचारांची दिशा मिळावी यासाठी कार्यक्रम आयोजित केला असल्याचे राजळे यांनी सांगितले. दोन्ही आयोजक संस्थांच्या कामाबाबाबत ज्ञानदेव दळवी यांनी माहिती दिली. ज्ञानदेव पांडुळे यांनी स्वागत केले. प्रा. अतुल यांनी मोरे यांचा परिचय करून दिला. किशोर मरकड यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा