राष्ट्रीय साखर कारखाना संघाच्या उत्कृष्ट तांत्रिक क्षमता वापराचा देशपातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला. केंद्रीय अन्न व नागरीपुरवठा मंत्री के. व्ही. थॉमस यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे यांना नवी दिल्लीत तो प्रदान करण्यात आला. साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयंतीलाल पटेल, उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे, शिवाजीराव पाटील यांच्यासह देशभरातील सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे व त्यांची पत्नी अनुपमा, संचालक अ‍ॅड. नीलेश बारखडे, मुख्य अभियंता तानाजी गुंड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पूर्वीही पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या वतीने उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जाणारे तीन पुरस्कार या कारखान्याने पटकावले आहेत. देशपातळीवरील पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्य साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गोरे यांचे अभिनंदन केले.   

Story img Loader