भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’च्या माध्यमातून १९२० मध्ये खऱ्या अर्थाने आपल्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. भारतातील राजकीय नेते, पत्रकार जेव्हा स्वराज्याची मागणी करीत होते, तेव्हा डॉ. आंबेडकरांनी सुराज्याचा आग्रह धरून प्रयोजनमूलक पत्रकारिता केली, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागातर्फे ‘मूकनायक स्थापना दिन’ कार्यक्रम सोमवारी घेण्यात आला, त्या वेळी ‘डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे अध्यक्षपदी होते. डॉ. पानतावणे म्हणाले, अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असताना ‘निग्रो’चे लढे व साहित्याचे वाचन बाबासाहेबांनी केले. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील वर्तमानपत्रे स्वातंत्र्यलढय़ाचा पुरस्कार करीत होते. काही अपवाद वगळता सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची त्यांची भूमिका उदासीन होती. तत्कालीन इतिहास संशोधकही प्राचीन भारताचा पराभवाचा इतिहास उगाळीत होते. बाबासाहेबांनी मात्र या इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. डॉ. आंबेडकर मात्र सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून नव्या भारताची मांडणी करीत होते. आजकाल पत्रकारितेत अभ्यासू व प्रयोजनमूलक पत्रकारांची वानवा आहे. सामाजिक दरी संपविण्याचे काम पत्रकारितेचे आहे, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. गव्हाणे म्हणाले, डॉ. आंबेडकर यांची पत्रकारिता सामाजिक परिवर्तनाची व दिशादर्शक अशी होती. परंपरागत पत्रकारितेला छेद देत बाबासाहेबांनी पत्रकारितेला एक नवा आयाम प्राप्त करून दिला. प्रास्ताविक मिलिंद आठवले यांनी, तर सूत्रसंचालन अन्वर अली यांनी केले. या वेळी ‘आय क्व्ॉक’चे संचालक डॉ. वि. ल. धारूरकर, भगवान सवाई, प्रा. जयदेव डोळे, डॉ. दिनकर माने आदींची उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा