डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील विविध संघटनांकडून त्यांना अभिवादन करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी केंद्र सरकारने बुधवारी मुंबई येथील इंदू मिलची जागा उपलब्ध करून दिल्याने आंबेडकरी जनतेत उत्साहाचे वातावरण होते.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजशिष्टाचार अधिकारी वैशाली इंदाणी, अन्नधान्य वितरण अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ, गृहशाखेच्या तहसीलदार रोहिणी आखाडे उपस्थित होते. शिक्षणखाते राज्य कर्मचारी संघटना व महसूल खाते राज्य कर्मचारी संघटना यांच्यावतीने उपजिल्हाधिकारी अपूर्वा वानखेडे यांच्या उपस्थितीत स्टेशन परिसरातील डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. पुणे विद्यापीठात कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे व दिलीप पाडगांवकर यांच्या हस्ते जयकर ग्रंथालयातील डॉ. आंबेडकर, शिवाजी महाराज, अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने अपंग शाळेतील विद्यार्थ्यांना फळवाटप करण्यात आले. रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने ५६५६ दीप प्रज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली.
  भारतरत्न डॉ. मौलाना अब्दुल कलाम आझाद स्मारक समितीच्या वतीने बोपोडी येथील आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांचा १५ फुटी भव्य पुतळा उभारून आदरांजली वाहण्यात आली.फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचातर्फे ५६ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त ५६ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन उच्चशिक्षित करण्याचा संकल्प करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडी, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे महानगरपालिका सेवानिवृत्त सेवक कृती, बहुजन विकास महासंघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर, स्त्री आधार केंद्र, पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या कॅन्टोन्मेंट ब्लॉक कमिटी, सिंबायोसिस संस्थेच्या वतीने डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Story img Loader