घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२२ वी जयंती शहरात विविध उपक्रमांनी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रतिमा पूजन, भव्य मिरवणुका, व्याख्याने आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील अनेक मंडळांनी या जयंतीची जय्यत तयारी केली होती. त्याचा प्रत्यय मध्यरात्रीपासून आला. मध्यरात्रीच्या १२ वाजण्याच्या सुमारास आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कसबा बावडा येथील डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या प्रतिमेची मिरवणूकही सायंकाळी सुरू झाली होती. भव्य आतषबाजी, एलसीडी प्रोजेक्टरचा समावेश आदी वैशिष्टय़ांचा यामध्ये समावेश होता.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दिन दलितांसाठी आयुष्य वेचणारा हा महामानव म्हणजे समतेचा महामेरू आहे, असे मत माने यांनी व्यक्त केले. अप्पर जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, पुरवठा अधिकारी संजय शिंदे, नायब तहसीलदार अनिता देशमुख, जिल्हा सैनिक कार्यालयाचे ए. एस. सरदेसाई, दिगंबर सानप आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा