बिहार दिनाचे औचित्य साधून कोल्हापूरचे सुपुत्र पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांनी बिहारच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. डॉ.पाटील बिहारचे ३४ वे राज्यपाल आहेत. अलीकडेच त्यांची त्रिपुराच्या राज्यपाल पदावरून बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती.
राजभवन परिसरात डॉ.राजेंद्र प्रसाद सभागृहात झालेल्या शानदार कार्यक्रमात पटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश एम.रेखा दोशीत यांनी डॉ.पाटील यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या वेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री सुशील मोदी, विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार, विरोधी पक्षनेते, काँग्रेस पदाधिकारी व डॉ.पाटील कुटुबीयांतील सदस्य उपस्थित होते.
राज्यपाल डॉ.पाटील नोव्हेंबर २००९ पासून त्रिपुराचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. त्रिपुराच्या साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सरकारी, मेडिकल, इंजिनिअरिंग कॉलेजसह विकासाचे प्रकल्प मंजूर केले. शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान असलेल्या डॉ.पाटील यांनी राज्यपालपद विकासाभिमुख असते हे दाखवून दिले.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी डॉ.पाटील यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. शुक्रवारी डॉ.पाटील यांनी शपथ घेतली. राजभवनात झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातून मोठय़ा संख्येने मान्यवर आले होते. यामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, आमदार सुभाष चव्हाण, केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य, डॉ.नरेंद्र जाधव, निवृत्त पोलीस आयुक्त आर.डी.त्यागी यांच्यासह पुष्पलता पाटील, डॉ.नंदिता पानशेतकर, प्रियदर्शनी पाटील, जयादेवी पाटील, प्रदीप पानशेतकर, पुणे येथील डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती पी.डी.पाटील, सुरेशराव चव्हाण-पाटील व ऋतुराज पाटील आदी उपस्थित होते.
बिहारमध्ये शिक्षण क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे. रोजगार निर्माण करणारे शिक्षण येथे शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यावर भर ठेवेन. मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री मोदी यांच्यासोबत संबंध चांगले असल्याने बिहारच्या विकासाबाबत कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती राज्यपाल डॉ.पाटील यांनी पत्रकारांना दिली.