पक्षातून निलंबित असलेल्या अमरावतीच्या दोन नेत्यांना स्वगृही परतण्याचे वेध लागले असून, माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांनी मंगळवारी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सन्मानाने बोलावल्यास भाजपमध्ये परत जाण्याचा विचार व्यक्त केला. दुसरीकडे, काँग्रेसमधून निलंबित माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनीही काँग्रेस प्रवेशासाठी धडपड चालवली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय सारीपाटावरच्या हालचाली वाढल्याचे संकेत यातून दिसून आले आहेत.
जगदीश गुप्ता यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी जंगी सोहळा आयोजित केला जातो. यंदा मात्र दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर जगदीश गुप्ता यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या समर्थकांनीही दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ३ लाख रुपयांचा निधी या दिवसाचे औचित्य साधून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सुपूर्द केला. यावेळी बोलताना जगदीश गुप्ता यांनी आपली विचारसरणी शंभर टक्के भाजपचीच असल्याचे सांगितले आणि सन्मानाने बोलावल्यास पक्षात परत येण्याची इच्छाही प्रदर्शित केली. गेल्या काही वर्षांपासून जगदीश गुप्ता हे राजकारणापासून अलिप्त असल्याचे भासवत होते. भाजपमध्ये असतानाही त्यांचे भाजपमधील अन्य नेत्यांसोबत सख्य नव्हते. त्यातच विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केल्याचा ठपका ठेवून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. तेव्हा त्यांच्या निकटच्या वर्तुळातील नगरसेवक आणि काही पदाधिकारी त्यांच्या पाठीशी उभे राहिले. गेल्या वर्षी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत जगदीश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जनकल्याण आघाडी स्थापन करण्यात आली. या आघाडीला केवळ एकच जागा मिळाली, पण त्यांनी आपले उपद्रवमूल्य भाजपला दाखवून दिले.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अमरावती मतदार संघात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांच्या विरोधात बंडखोरी केल्याबद्दल डॉ. सुनील देशमुख यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या बाजूनेही काँग्रेसमधील एक गट उभा झाला. जनविकास काँग्रेस हा पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला. जगदीश गुप्ता यांच्याप्रमाणेच डॉ. देशमुख यांनीही पक्षाचे पद घेतले नाही. महापालिकेच्या निवडणुकीत जनविकास काँग्रेसला ६ जागा मिळाल्या. काही जागांवर त्यांच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना घायकुतीला आणले. या दोन्ही नेत्यांना अपेक्षित यश मिळाले नसले, तरी आपल्या अस्तित्वाची चुणूक त्यांनी दाखवून दिली. प्रतिभाताई पाटील यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्याबरोबर डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेस प्रवेशासाठी हालचाली वाढवल्याचे दिसून आले. अजूनही त्यांना पक्षाकडून स्पष्टपणे हिरवा कंदील मिळाला नसला तरी ते आशावादी आहेत.   जगदीश    गुप्ता  यांनी तर आपली इच्छा    स्पष्टपणे    बोलूनही    दाखवली   आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, यावर डॉ. सुनील देशमुख यांचे भवितव्य अवलंबून आहे. दुसरीकडे जगदीश गुप्ता यांच्या भाजप प्रवेशाचे दार उघडण्याचा निर्णय सर्वस्वी गोपीनाथ मुंडे यांच्यावर अवलंबून आहे. महापालिकेच्या निवडणुकीत दहा जागांवर जनविकास काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. जगदीश गुप्ता यांच्या जनकल्याण आघाडीने सहा जागांवर अशीच कामगिरी केली. याची नोंद उभय पक्षांनी घेतली आहे.
डॉ. सुनील देशमुख आणि जगदीश गुप्ता हे सध्या एकाच व्यासपीठावर आलेले असले, तरी भविष्यात त्यांचे मार्ग वेगवेगळे दिसू शकतात, याचे संकेत मिळाले आहेत. दोघांचेही स्वतंत्र गट आहेत. सत्तेची चव दोन्ही गटांनी चाखली आहे. हे दोन्ही गट सध्या अस्वस्थ आहेत. हाच एक ‘समान धागा’ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा