गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करणारे रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे नेते डॉ. राजेंद्र गवई सध्या चांगलेच दुखावले असून राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला घडय़ाळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह केल्यास स्वबळावर निवडणूक लढण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. राजेंद्र गवई यांनी लोकसभा निवडणूक घडय़ाळ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्हावर लढवावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी प्रदर्शित केल्यानंतर डॉ. गवई नाराज झाले आहेत. त्यांनी आपली नाराजी वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवली आहे.
 रिपब्लिकन पक्षाच्या (गवई गट) नुकत्याच झालेल्या मेळाव्यात डॉ. राजेंद्र गवई यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पण, राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रतिसाद मिळत नसल्याने ते अस्वस्थ झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा मित्रपक्ष आहे. आजपर्यंत आम्ही त्यांना समर्थ साथ दिली आहे. आता काही स्थानिक नेते घडय़ाळ चिन्हावर आपण निवडणूक लढवावी, असा आग्रह करीत आहेत, हे चुकीचे आहे. हा रिपब्लिकन पक्षाचा अपमान आहे. दलित जनतेची ती अवमानना होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. ते मित्रपक्षाला त्यांच्या पक्षचिन्हावर निवडणूक लढवण्याविषयी दबाव आणणार नाहीत, असे डॉ. राजेंद्र गवई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमची युती आहे. केवळ अमरावती लोकसभा मतदार संघ रिपब्लिकन पक्षासाठी सोडावा, अशी आमची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मागू. गेल्या निवडणुकीत आपण रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावरच लढलो. आताही तीच इच्छा आहे. त्याबाबत तडजोड कशी करता येईल, असा सवाल त्यांनी केला. हा प्रश्न लवकरच सुटेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसने सहकार्यासाठी नकार दिल्यास राज्यात अमरावती, बुलढाणा, शिर्डी आणि ईशान्य मुंबई, या चार मतदार संघात स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी रिपब्लिकन पक्षाने केली आहे. या मतदार संघांसह एकूण १३ मतदार संघांमध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला रिपब्लिकन पक्षाची शक्ती ठावूक आहे. आमची साथ सोडल्याने कोणता संदेश जाईल, हे वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे. शरद पवार योग्य तो निर्णय घेतील. पण, आपण आपल्या भूमिकेपासून मागे हटणार नाही, असे डॉ. गवई म्हणाले.
गेल्या निवडणुकीत अमरावती मतदार संघातून डॉ. राजेंद्र गवई यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यांना शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी पराभूत केले होते. अडसूळ यांना ४२.९२ टक्के, तर डॉ. गवई यांना ३४.५० टक्के मते मिळाली होती. रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रा. सु. गवई हे सक्रीय राजकारणापासून दूर झाले असले, तरी त्यांचे शरद पवार यांच्याशी घनिष्ट संबंध आहेत. काही महिन्यांपूर्वी अमरावतीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याच्या निमित्ताने शरद पवार यांनी रा.सू. गवई यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली त्यावेळी अमरावती लोकसभा मतदार संघातील तयारीविषयी उभय नेत्यांमध्ये चर्चाही झाली. त्यानंतर डॉ. गवई हे प्रचाराच्या कामाला वेगाने लागले.  

काही स्थानिक नेते घडय़ाळ चिन्हावर आपण निवडणूक लढवावी, असा आग्रह करीत आहेत, हे चुकीचे आहे. हा रिपब्लिकन पक्षाचा अपमान आहे. दलित जनतेची ती अवमानना होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. ते मित्रपक्षाला त्यांच्या पक्षचिन्हावर निवडणूक लढवण्याविषयी दबाव आणणार नाहीत, असे डॉ. राजेंद्र गवई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

Story img Loader