अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत आता शालेय वयात असलेल्या मुलांकडूनच मी अपेक्षा करू शकतो. कारण प्रौढ व्यक्तींची मनोधारणा एका मर्यादेपलीकडे बदलता येणे शक्य नाही. त्यामुळे मुलांवर आतापासूनच योग्य संस्कार केले तर भविष्यातील पिढी विवेकपूर्ण विचार करेल, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
ठाण्यातील हितवर्धिनी संस्थेच्या पटांगणात डॉ. जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर यांनी रसिक श्रोत्यांशी संवाद साधला. मोहन आपटे आणि अ.पां. देशपांडे यांची त्यांनी मुलाखत घेतली. ठाण्यातील विद्यार्थ्यांच्या काही प्रातिनिधिक प्रश्नांनाही या दाम्पत्याने मनमोकळी उत्तरे दिली. शिक्षण क्षेत्रात सध्या बोकाळलेली कोचिंग क्लास संस्कृती हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे स्वयंअध्ययन आणि स्वत: विचार करण्याचे कौशल्य विकसित होण्यात बाधा येते. खरे तर अभ्यासासाठी नेमण्यात आलेली पाठय़पुस्तके सक्षम आहेत. मात्र पालक तेवढीही तसदी घेत नाहीत, अशी खंत मंगला नारळीकर यांनी व्यक्त केली. सध्या पृथ्वीवरील जीवसृष्टी बाहेरून आली असा पद्धतीचा एक सिद्धांत मांडला जात आहे. धुमकेतूमध्ये असणारे जिवाणू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाद्वारे पृथ्वीवर आले असे काहींचे म्हणणे आहे. त्याच्या पुष्टय़र्थ काही पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अवकाशात सोडलेल्या फुग्यात काही जिवाणू आढळून आले आहेत. त्यातील काही जिवाणू अगदी नवे आहेत, अशी माहितीही डॉ. नारळीकर यांनी यावेळी दिली. खगोल अभ्यासक आणि संशोधकांच्या चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळण्यासाठी पुण्यात आयुकाची स्थापना करण्यात आली. तीन दशकांच्या कारकिर्दीत या संस्थेने चांगली कामगिरी केल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मत आहे. विशेषत: गुरुत्वाकर्षणाच्या विविध लहरींचे विश्लेषण करण्यात संस्थेला चांगले यश आल्याची माहिती डॉ. नारळीकर यांनी यावेळी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा