महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही अतिशय वाईट घटना आहे. त्यांनी कधीच शस्त्रं वापरली नाही, कधीच आपली मते आक्रमक पद्धतीने मांडली नाहीत. लेखणीच्या जोरावरच समाजात प्रबोधन करण्याचे काम ते अतिशय प्रामाणिकपणे करत असे. परंतु, त्यांच्याशी वैचारिक पद्धतीने संघर्ष करण्याची शक्ती नसलेल्यांनी त्यांची हत्या के ली. ही एक प्रकारची विकृत मानसिकताच असावी. अशा विकृत मानसिकतेचा बंदोबस्त हा व्हायला हवा आणि हाच बंदोबस्त कसा करणार हा एक प्रश्न निर्माण झाला आहे, असे मत मान्यवरांनी श्रद्धांजली सभेत मांडले.
 सांस्कृतिक संकुलातील विदर्भ साहित्य संघाच्या वतीने डॉ. दाभोलकर यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार, डॉ. सुनीती देव, वामन तेलंग, प्रकाश दुबे, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. रमेश जनबंधू आदींनी आपले मत व्यक्त केले.  
सुरेश द्वादशीवार म्हणाले, डॉ. दाभोलकर हे अत्यंत संवेदनशील, स्वतंत्र विचाराचे होते. जादूटोणा विधेयकासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम हा कादंबरीचा विषय आहे. शासनाने वटहुकूम काढला त्यामुळे त्यांचे बलिदान वाया गेले, असे म्हणता येणार नाही. पुरोगामी महाराष्ट्रात ही गोष्ट खरोखरच लाजिरवाणी आहे. त्यांच्या जाण्याने पुरोगामित्वाचेच नव्हे चळवळीचे नुकसान झाले आहे.
सुनीती  देव म्हणाल्या, त्यांच्या हत्येने इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. हत्या करणाऱ्याचे उदात्तीकरण करणारी पिढी निर्माण होत आहे, ही चिंतेची बाब आहे. अशा घटना समाजात होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. प्रबोधनाची चळवळ अधिक जोमाने समोर नेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे, असे  वामन तेलंग यावेळी म्हणाले. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हत्या व्हावी अतिशय दुर्दैवाची बाब आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या कमी असून विरोधकांची संख्या जास्त आहे. यापुढे कार्यकर्त्यांची संख्या वाढविणे हीच त्यांना खरी  श्रद्धांजली होय, अशी शोकसंवेदना डॉ. रमेश जनबंधू यांनी प्रकट केली.
यावेळी दोन मिनिटे मौन पाळून दाभोलकरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेला वि.सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, वसंत वाहोकार, नरेश सबजीवाले, शुभदा फडणवीस, प्रकाश एदलाबादकर, शोभा उबगडे, आदी उपस्थित होते.

Story img Loader