धर्माच्या नावावर अधर्म पसरवू पाहणाऱ्या शक्ती एकीकडे व दुसऱ्या बाजूला कोणतेही सामाजिक उत्तरदायित्व मानणार नाही असे लोकप्रतिनिधी, अशी कोंडी झाली आहे. व्यवस्थेला प्रश्न विचाराल तर संपवून टाकले जाईल, असा संदेश डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर दिला गेला आहे. मानवता धर्म कट्टरतावादाकडे नेण्याची मोहीम चालविली जात आहे. या दोन्ही शक्तींच्या विरोधात ‘आम्ही सगळे दाभोलकर’ हा संदेश देत कृतिशील होण्याची गरज डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.
धडाडीचे पत्रकार अनंत भालेराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात ७५ हजारांचा निधी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यास देण्यात आला. ज्ञानप्रकाश मोदाणी यांनीही पुढील १० वर्षे ५१ हजार रुपये देण्याचे जाहीर केले. पहिल्या वर्षीची रक्कम या कार्यक्रमात देण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ, प्रतापराव बोराडे, डॉ. प्रभाकर पानट, सविता पानट आदींची उपस्थिती होती.
हमीद दाभोलकर म्हणाले की, अनंत भालेराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा पुरस्कार डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मिळाला असता, तर त्यांना त्याचे वेगळे अप्रूप वाटले असते. तसा त्यांना पुरस्काराचा सोस कधीच नव्हता. मात्र, कार्यकर्ता व संपादक अशी दोन्ही व्यक्तिमत्त्वे ज्यांच्या ठायी होती, ज्यांनी लेखणी व वाणीच्या माध्यमातून काम करताना कार्यकर्तेपण सांभाळले, ते अनंत भालेराव व डॉ. नरेंद्र दाभोलकर एकाच मुशीतील होते. तेही कार्यकर्ता संपादकच होते. ज्या विवेकवादाचा पुरस्कार ते करीत होते, तो विवेकवाद डॉ. दाभोलकरांनी जपला.
डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम थांबले नाही. त्यांनी ठरविलेले कार्यक्रम पुढे जशास तसे सुरू आहे. एक खंत मात्र सर्वत्र आहे. ती अजूनही डॉ. दाभोलकरांचे मारेकरी सापडू शकले नाहीत. तो हल्ला कायदा-सुव्यवस्थेचा असल्याने त्या विषयीची नाराजी व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सह्य़ांचे निवेदन पाठविण्याचे ठरले आहे. यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचे भाषण झाले. तत्पूर्वी ज्येष्ठ समीक्षक डॉ. रसाळ यांनी ‘अनंत भालेराव यांचा विवेकवाद’ या विषयावर भाषण केले.
दाभोलकरांच्या कार्यासाठी सरसावले दातृत्वाचे हात!
धडाडीचे पत्रकार अनंत भालेराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात ७५ हजारांचा निधी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यास देण्यात आला. ज्ञानप्रकाश मोदाणी यांनीही पुढील १० वर्षे ५१ हजार रुपये देण्याचे जाहीर केले.
First published on: 27-10-2013 at 01:57 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr narendra dabholkars work rs 75 thousand fund raised