केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या लातूर प्रेमाला भरती आली असून त्यांच्या लातूरच्या वाऱ्या वाढल्या आहेत.
दोन महिन्यांपूर्वी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त माध्यम परिवारातर्फे आयोजित व्याख्यानास डॉ. जाधव उपस्थित होते. लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यास या मतदारसंघाची चाचपणी केलेली बरी, या साठी त्यांनी या व्याख्यानाचे निमंत्रण स्वीकारल्याची चर्चा होती. शहरातील शाहू महाविद्यालय व उदगीरच्या राजीव गांधी तंत्रनिकेतनमध्ये शनिवारी त्यांची व्याख्याने झाली. दोन्ही महाविद्यालयांची निवेदने स्वीकारून त्यांनी लोकांशी चर्चा करण्याची संधी सोडली नाही.
लातूर शहराबरोबरच लातूर लोकसभा मतदारसंघातील उदगीर मोठे शहर आहे. त्यामुळे थोडीशी धावपळ झाली, तरी एकाच दिवसांत दोन व्याख्यानांचे निमंत्रण त्यांनी स्वीकारले. लातूर मतदारसंघातील काँग्रेस कार्यकत्रे व मतदारही विद्यमान खासदार जयवंत आवळे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा लक्षात घेऊन डॉ. जाधव यांनी लातूर लोकसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यास एकीकडे श्रेष्ठींकडे प्रयत्न सुरू ठेवतानाच मतदारसंघातही थेट संपर्क सुरू केला आहे.
नांदेड विभागाचे तत्कालीन क्षेत्रीय पोलीस महासंचालक रामराव घाडगे हे औसा विधानसभा मतदारसंघ डोळय़ासमोर ठेवून विविध मेळावे घेत असत. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली व त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. तशी वेळ नरेंद्र जाधवांवर येणार नाही याची काळजी घेण्यासाठी मतदारसंघाची थेट चाचपणी सुरू करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा