दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनत चाललेल्या सोलापूरचे जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांची तडकाफडकी बदली झाली असून, त्यांच्या जागेवर नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती झाली आहे. गेडाम हे कडक शिस्तीचे पारदर्शी आणि धडाकेबाज निर्णय घेणारे सनदी अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे सामान्य नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. तर ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आशा बळावल्या आहेत.
गोकुळ मवारे यांना तडकाफडकी बदलण्यात आल्यानंतर त्यांना लगेचच नवीन नेमणूक मिळाली नाही. त्यासाठी त्यांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्या वर्षांपूर्वी ते जिल्हाधिकारीपदावर रुजू झाले होते. परंतु अल्पावधीत त्यांना बदलण्यात आले.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी उशिरा डॉ. गेडाम यांनी मावळते जिल्हधिकारी गोकुळ मवारे यांच्या अनुपस्थितीत पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावाही घेतला. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी जिल्हय़ाचा कारभार पारदर्शक, शिस्तबद्ध व प्रामाणिकपणे करून सामान्यजनांना दिलासा देण्याची ग्वाही दिली. विशेषत: जिल्हय़ातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यावर आपला भर राहील, असेही ते म्हणाले.
गेले वर्षभर जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती भेडसावत असून, त्यावर मात करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची कार्यक्षमता फारच तोकडी ठरत असल्याचा अनुभव होता. दुसरीकडे वाळूमाफिया, तेलमाफियांनी कहर केला आहे. यात जिल्हा प्रशासन स्वत:ची जबाबदारी पार न पाडता राजकीय पुढाऱ्यांच्या तालावर नाचत असल्याची चर्चा शर्वत्र ऐकायला मिळत होती. प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी वाढत होती. या पाश्र्वभूमीवर जिल्हय़ात कार्यक्षम व शिस्तबद्ध जिल्हाधिकारी हवा असा सूर सर्वत्र ऐकायला मिळत होता. या पाश्र्वभूमीवर, पुणे येथील भूजल सर्वेक्षण व विकास विभागाचे संचालक डॉ. प्रवीण गेडाम यांची सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदावर नियुक्ती झाली.
यापूर्वी डॉ. गेडाम यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय सेवा केली होती. विशेषत: तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे पदसिद्ध अध्यक्ष या नात्याने त्यांनी भरीव सुधारणा केल्या व मंदिर प्रशासनात शिस्त लावली होती. लातूरमध्ये कार्यरत असताना त्यांनी एकाच दिवशी शाळांतील विद्यार्थ्यांची पटपडताळणी करून शिक्षण क्षेत्रात दरारा निर्माण केला होता. जळगाव येथे असताना तेथील गाजलेला घरकुल घोटाळा उघडकीस आणून त्याप्रकरणी राज्यमंत्री गुलाबराव देवकर व आमदार सुरेश जैन यांच्यासह अनेक बडय़ा धेंडांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला होता. डॉ. गेडाम यांच्यासारखा जिल्हाधिकारी सोलापूरला लाभावा अशी अपेक्षा गेल्या अनेक दिवसांपासून व्यक्त होत होती. ती अखेर पूर्ण झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.