दि. १५ ला गौरव सोहळा
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने देण्यात येणारा लोकनेते मारुतराव घुले स्मृती पुरस्कार यंदा पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांना देण्याची घोषणा माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी आज केली.
(स्व.) मारुतराव घुले यांच्या ८२ व्या जयंतीदिनी येत्या दि. १५ ला ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्ञानेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर सकाळी १० वाजता माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, कारखान्याचे उपाध्यक्ष देसाई-देशमुख आदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ५१ हजार रूपये, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अभंग यांनी सांगितले की, (स्व) मारुतराव घुले यांच्या स्मरणार्थ गेल्या सहा वर्षांपासून कारखान्याच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. अध्यापन, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल यंदा डॉ. कसबे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. याआधी सावली संस्था, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. अभय बंग, रावसाहेब शिंदे यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. सहकार, राजकारण व समाजकारणात प्रदीर्घ काळ काम करताना (स्व) घुले यांनी कायम सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी मानले. प्रामुख्याने शेतकरी हिताचा ध्यास घेऊन ते सतत शेतकऱ्यांसाठी कार्यरत राहिले. केवळ साखर कारखान्याचे नव्हे तर त्या माध्यमातून शैक्षणिक संस्था, शेतीविषयक विविध संस्था आदी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या. हाच वारसा पुढे चालवत कारखान्याना विविध उपक्रम राबवत आहे, असे अभंग म्हणाले. सुरुवातीला कारखान्याचे सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे यांनी कारखाना व कारखान्याच्या सांस्कृतिक मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. साडेबाराशे टन क्षमतेचा कारखाना गेल्या ३५ वर्षांत ७ हजार टनांपर्यंत वाढला असून एकात्मिक खत प्रकल्प, एकात्मिक शेती व्यवस्थापन आदी क्षेत्रातही कारखान्याने राज्यात स्वतंत्र ठसा उमटवल्याचे त्यांनी सांगितले. के. एन. गायके, शेषराव गायकवाड, सुखदेव फुलारी आदी यावेळी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा