लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या सहस्रचंद्रदर्शनाचा भावपूर्ण कौटुंबिक सोहळा अलीकडेच उत्साहात साजरा करण्यात आला.
 या सोहळ्याला संपूर्ण मुनगंटीवार कुटुंब आवर्जून उपस्थित होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार व्यासपीठावर विराजमान होते. वडिलांचे मोठेपण आणि त्यांच्याप्रती आयोजकांचे अतीव प्रेम त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने अनुभवले. एखाद्या शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी आपल्या संस्थाचालकाचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा कसा साजरा करावा, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांनी व्यक्त केले. तेही हा सोहळा पाहून भारावले होते. आशीर्वचनाच्या मंत्रोच्चारात शिक्षिकांनी त्यांना औक्षण करून हा सोहळा साजरा केला. शाळेच्या विद्यार्थिनींनीही ही भारतीय संस्कृती अनुभवली. टाळय़ांच्या कडकडाटात त्यांनी डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या. नंतर शाळेच्या वतीने सर्व मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापकांनी शाल-श्रीफळ व भेटवस्तू देऊन डॉ. मुनगंटीवार यांचा सत्कार केला. लोकमान्य टिळक स्मारक मंडळाच्यावतीने सचिव अ‍ॅड. रवींद्र भागवत यांच्यासह सर्व संचालकांनी भेटवस्तू देऊन डॉक्टरांचे अभीष्टचिंतन केले.
अहेरी येथील शाळा, तसेच सिव्हील लाइनच्या शाळेतील मुख्याध्यापकांच्या वतीनेही डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. डॉ. आईंचवार यांच्या हस्ते डॉ. मुनगंटीवार यांचा सत्कार झाला. व्यासपीठावर विराजमान आमदार सुधीर मुनगंटीवार, डॉ. विजय आईंचवार, अ‍ॅड. रवींद्र भागवत, अ‍ॅड. देशमुख, चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळ हुंदगुंद यांच्यासह समोर उपस्थित स्मारक मंडळाच्या कौटुंबिक सदस्यांनी हा आगळा उत्सव अनुभवला. नव्हे, तो डोळय़ात कायमचा साठवून ठेवला. अ‍ॅड. रवींद्र भागवत म्हणाले, हा सोहळा संस्थेच्या संचालकांनी नव्हे, तर शिक्षकांनी घडवून आणला आहे. डॉक्टरांप्रती आपले प्रेम व्यक्त करणार हा कौटुंबिक आपुलकीचा कार्यक्रम आहे. लहान असताना डॉक्टर मुनगंटीवार यांच्यासोबत त्यांच्या कारने पहिल्यांदा नागपूरला जात असतानाच्या आठवणींना अ‍ॅड. भागवत यांनी उजाळा दिला. डॉक्टरांच्या वागण्या-बोलण्यात कुठलाही बडेजावपणा कधी दिसत नसून त्यांची शीतलता दुसऱ्यांप्रती असली तरी स्वत:च्या बाबतीत ते अतिशय कठोर आणि प्रखर असल्याचे भागवत म्हणाले. वयाचे ८० वष्रे पूर्ण केल्यानंतर आजही ते संस्कृत शिकत असून संस्कृतची परीक्षा देत असल्याची गोष्टही त्यांनी सर्वाना सांगितली. या समाजात डॉक्टरांसारखे व्यक्तिमत्त्व असल्यामुळेच या समाजाचा चांगुलपणा टिकून आहे, अशा शब्दात अ‍ॅड. भागवत यांनी डॉ. मुनगंटीवार यांच्याप्रती सदिच्छा व्यक्त केल्या.
अ‍ॅड. देशमुख आणि बाळ हुंदगुंद यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. भारावलेल्या वातावरणात तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाच्या शेवटी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचा कंठ अनेकदा दाटून आला होता. सत्काराला उत्तर देताना हा सोहळा घडवून आणल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे मन:पूर्वक आभार मानले. तत्पूर्वी, अक्षरवेल या मासिकाचे प्रकाशन डॉ. विजय आईंचवार यांच्या हस्ते झाले. आपल्या मनोगतानंतर डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी शाळेला एका ठराविक निधीचा धनादेश दिला. निधी त्यांनी जाहीर केला नाही. हा धनादेश संस्थेचे सचिव अ‍ॅड. भागवत यांनी स्वीकारला. प्रास्ताविक रोडे यांनी, तर संचालन प्रशांत आर्वे यांनी केले.