परंपरा आणि आधुनिकतेच्या समन्वयातून वर्तमानाशी नाते जोडण्याचा प्रयत्न आपण लेखनातून सातत्याने केला आहे. त्यासाठी इतिहासाशी नाळही तुटू दिली नाही. त्यातूनच महाराष्ट्राच्या समग्र बदलांचा वेध घेण्याचा प्रयत्न लेखनातून केला आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या पाश्र्वभूमीवर येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय केंद्र आणि विश्वास बँक यांच्या वतीने गंगापूर रस्त्यावरील शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. मोरे यांची मुलाखत कवी किशोर पाठक यांनी घेतली.
तुकारामांच्या भाषेचा सामाजिक चळवळींवर, संस्कृतीवर प्रभाव आहे. तुकोबा ही जनमानसांची अपरिहार्य गरज आहे. त्यांच्या विरोधकांनीही तुकोबांचाच आधार घेतला आहे, असे मत डॉ. मोरे यांनी मांडले. ‘तुकाराम दर्शन’ लिहिताना वर्तमानाशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाही वाचकांनी प्रतिसाद दिला. ‘लोकमान्य ते महात्मा’ या ग्रंथातून महाराष्ट्राची सामाजिक जडणघडण, राजकारण यांचा वेध घेतानाच समृद्ध परंपरेचा शोध घेणे आव्हान मानले. त्यातून व्यापक पट असलेला ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा ग्रंथ ‘उजळल्या दिशा’, शिवचरित्रावरील नाटके लिहून झाली. ‘बालगंधर्व व गोहरजान’ यांच्यावर सध्या नाटक लिहीत असून यशवंतराव चव्हाण यांच्या चरित्राचे लेखनही करणार असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले.
या वेळी त्यांनी साहित्य, सांस्कृतिक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक विचारधारा यांवर विवेचन केले. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा