समतावादी सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र व युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशन (यूएसए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पहिल्या राज्यस्तरीय समतावादी विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा.डॉ.रवींद्र ठाकूर (मराठी विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली आहे.
पहिल्या राज्यस्तरीय समतावादी विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीची बैठक स्वागताध्यक्ष डॉ.उत्तम सकट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. फुले, शाहू, आंबेडकर व अण्णा भाऊ साठे यांच्याविचार प्रेरणेने समतावादी सांस्कृतिक चळवळ व यूएसए या दोन संघटना कार्यरत आहेत. सर्वच प्रकारच्या विषमतेविरुद्ध समतेच्या समर्थकांनी एकत्र येऊन लढा उभारावा ही दोन्ही संघटनांची भूमिका आहे. या भूमिकेतून हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.रवींद्र ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ.ठाकूर हे मराठीतील ख्यातकीर्त साहित्यिक व समीक्षक म्हणून ओळखले जातात. गेली ३० वर्षे ते मराठीच्या अध्यापन व संशोधन कार्यात सक्रिय आहेत. कविता, कथा, कादंबरी, ललित गद्य व समीक्षा आदी बहुविध स्वरूपाचे लेखन त्यांनी सातत्याने केले आहे. तर महात्मा, उद्या पुन्हा हाच खेळ, धर्मयुद्ध, व्हायरस या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. क्रांतिजागर, साहित्यसंवाद, आत्मसंवाद हे ग्रंथ त्यांनी संपादित केले आहेत. अनिकेत, दस्तुरखुद्द हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या साहित्यकृतींना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
या बैठकीस स्वागताध्यक्ष डॉ.उत्तम सकट, यूएसएचे राज्याध्यक्ष प्रकाश नाईक, अमोल महापुरे, प्रा.धनाजी साठे, अॅड.रणजित कवाळे, प्रवीण लोंढे, प्रा.आलम शेख, शहाजी शिंदे, विश्वनाथ तरळ, किरण मोरे, प्रवीण वाघमारे, गोरख सकटे, तेजस्विनी थोरात, तेजस्विनी सुतार आदी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा