सहकार नेते डॉ.वा.रा.उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांचे आज दुपारी २.३० वाजता अकोला येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ९० वषार्चे होते. डॉ.कोरपे यांच्या पश्चात बंधु केशवराव, पत्नी माजी आमदार डॉ. कुसुमताई, मुलगे डॉ. संतोषकुमार, सतीश, डॉ. सुभाषचंद्र यांच्यासह तीन मुली, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. डॉ. अण्णासाहेब कोरपे यांची अंत्ययात्रा त्यांच्या रामकृष्ण निकेतन या जठारपेठेतील निवासस्थानाहून उद्या दुपारी २ वाजता निघेल. त्यांच्यावर मोहता मिल हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे आमच्या अकोल्याच्या प्रतिनिधीने कळवले आहे.
अमरावती जिल्ह्य़ातील जैनपूर येथे डॉ. वामनराव रामकृष्ण कोरपे यांचा जन्म ३ मे १९२३ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापूर येथे झाले. त्यांनी एल.एम.पी (सी.पी.) ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त केली होती. चलेजाव चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सहभाग होता. अकोला जिल्हा बँकेचे १९६६ पासून सुमारे २७ वर्षे अध्यक्ष होते. अकोला जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटीची स्थापना व संस्थापक अध्यक्ष, अकोला जिल्हा सहकारी मुद्रणालयाची स्थापना त्यांनी केली. अकोला जिल्हा सहकारी साखर कारखान्याची स्थापना १९८८ मध्ये त्यांनी केली. त्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दोनदा उपाध्यक्ष व सतत २७ वर्षे संचालक, महाराष्ट्र सहकारी फर्टिलाइझर व केमिकल्सचे दोनदा उपाध्यक्ष, विदर्भ को-ऑप. मार्केटिग सोसायटी नागपूरचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. अकोला जिल्ह्य़ात सहकार चळवळ त्यांनी व्यापकपणे उभारली. या चळवळीतून जिल्ह्य़ात सहकाराचे मोठे जाळे निर्माण केले. अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले. महाराष्ट्र कापूस संघाची स्थापना व तिचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते काही काळ होते. १९७६ साली महाराष्ट्र शासनाच्या कापूस अभ्यासक समितीचे ते अध्यक्ष होते. २००५ मध्ये त्यांनी ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ या पुस्तकाचे लेखन केले. विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी म्हणून त्यांचा नावालौकीक होता तसाच राजकीय क्षेत्रातही त्यांचा मोठा दबदबा होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा