जगामध्ये अनेकदा संगणकाच्या क्षमतांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. संगणक हे करू शकेल का, ते करू शकेल का असे प्रश्नही विचारले जातात, मात्र आपण जे काही करतो, त्यापेक्षा अत्यंत उच्च कोटीचे काम संगणक अगदी सहज करू शकतो. संगणकाने आत्तापर्यंत जे काम केले आहे, ते काम करण्यासाठी जगातील सर्व माणसे एकत्र येऊन प्रचंड वेळ घेऊनही इतके परिपूर्ण काम करणे अशक्य आहे. त्यामुळे संगणकाच्या क्षमतांच्या मर्यादा शोधण्यापेक्षा त्या क्षमता वाढवण्याकडे तरुणांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि परम संगणकाचे निर्माते डॉ. विजय भाटकर यांनी डोंबिवलीच्या चतुरंग रंगसंमेलनाच्या निमित्ताने तरुणांशी संवाद साधताना व्यक्त केले.
चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने डोंबिवलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रंगसंमेलनामध्ये मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरांतील विविध महाविद्यालयांतील निवडक ५० विद्यार्थाना डॉ. विजय भटकर यांच्याशी संवाद साधण्याची अनोखी संधी उपलब्ध करून दिली होती.
रविवारी सकाळी स. वा. जोशी विद्यालयाच्या एका वर्गामध्ये विद्यार्थाचा हा वर्ग भरला होता. डॉ. विजय भटकर यांनी आपल्या संशोधनात्मक विचारांचे आणि करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची सूत्रे या विद्यार्थासाठी खुल्या संवादाच्या रूपाने व्यक्त केली.
विज्ञानाचा अभ्यास ‘मला हे माहीत नाही’ येथून सुरू झाला पाहिजे व ती माहिती मिळवण्यासाठी प्रत्येक गोष्ट उलगडून पाहिली पाहिजे. त्यातून तुम्हाला विज्ञानाचे योग्य ज्ञान मिळू शकते. ज्ञान मिळवणे ही एक प्रक्रिया आहे आणि ती नेहमीच चालत राहते. त्यामुळे विद्यार्थाने जिज्ञासू वृत्तीने हे ज्ञान शोधत राहण्याची गरज आहे. विज्ञान म्हणजे एखाद्या प्रश्नाचे एकच उत्तर असा आपल्याकडे समज असला तरी, आपल्याला समजलेले तेच विज्ञानाचे खरे उत्तर असा ठाम आत्मविश्वास विद्यार्थानी बाणवला पाहिजे, असे भटकर म्हणाले.
वर्गामध्ये भटकरांच्या विचारांनी विद्यार्थीही प्रफुल्लित झाले होते. संगणकाला प्रोग्रॉमिंग केल्याशिवाय तो कार्यच करू शकत नाही अशी शंका एका विद्यार्थिनीने यावेळी मांडली. त्याला उत्तर देताना भटकरांनी सांगितले की, माणसालाही प्रोगॉमिंग करावे लागत असते. त्याची आई, कुटुंब, समाज त्याला प्रोग्रॅम करत असते.
शिकल्याशिवाय संगणकाप्रमाणेच तुम्हालाही काही येऊ शकत नाही. त्यामुळे हा त्यांच्या आणि आपल्या मधला सारखेपणाच आहे. संगणक विविध सेन्सरच्या मदतीने वास, चव, तापमान, भाषा समजू शकतो.
संगणकाच्या मर्यादा..
संगणकाच्या क्षमतानंतर भटकरांनी संगणकाच्या मर्यादाही तितक्याच प्रभावीपणे विद्यार्थाना समजाऊन सांगितल्या. माणूस ऐकण्याची, बोलण्याची, पाहण्याची, विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची कृती एकाच वेळी करू शकतो संगणकाला हे करताना मर्यादा येतात. पाचवीच्या मुलाला एखादे पुस्तक वाचनानंतर त्याला त्याखालचे प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांचे उत्तर ते मूल सहज देऊ शकते, मात्र लाखो पुस्तके संग्रही असूनही परमसंगणकाला प्रश्नाचे उत्तर देणे मात्र अशक्य असते. तुम्ही हस्ताक्षरात लिहिलेले शब्द समजून घेणे संगणकास अवघड जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा