मराठी रंगभूमीवरील सध्याच्या विनोदी, कौटुंबिक आणि पुनरुज्जीवित नाटकांच्या गर्दीत लवकरच एक चरित्रात्मक नाटक सादर होणार आहे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी टीका, अवहेलना सोसून झपाटून काम केलेले महात्मा जोतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ‘ज्योती सावित्री’ हे नाटक रंगभूमीवर सादर होणार आहे.
महात्मा जोतिबा फुले यांच्या १२४ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने २८ नोव्हेंबर रोजी माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. जोतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य, जाती आणि समाजातील विषमतेच्या विरोधात दिलेला लढा आणि त्यांनी केलेली क्रांती आजच्या नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे.
स्वयंदीप नाटय़संस्थेने हे नाटक सादर केले असून याची निर्मिती व लेखन मंगेश पवार व कविता मोरवणकर यांची आहे. नाटकाचे दिग्दर्शन प्रमोद सुर्वे यांचे आहे.
नाटकात जोतिबा फुले यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा आणि त्यांच्या सामाजिक कामांचा आढावा घेण्यात आला आहे. जोतिबा फुले यांच्या पुण्यातील वाडय़ात काही प्रसंगांचे चित्रीकरण करण्यात आले असून ते नाटकात दाखविले जाणार आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना, अस्पृश्यांसाठी खुला केलेला हौद, सावित्रीबाई यांना शिक्षणासाठी झालेला विरोध आदी काही महत्त्वाच्या घटनांचा यात समावेश आहे. नाटकात विक्रांत वाडकर आणि प्रतीक्षा साबळे हे अनुक्रमे जोतिबा आणि सावित्रीबाई यांच्या भूमिकेत आहेत.