अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची निवडणूक नटांनी लढविण्यापेक्षा ज्यांना रंगभूमी विकासासाठी खरच काम करायचे अशा कार्यकर्त्यांनी लढविणे गरजेचे आहे. यामुळे वाद टळू शकतील आणि रंगभूमीचा विकास होईल, असे मत नाटय़कलावंत आणि अभिनेते अतुल परचुरे यांनी व्यक्त
केले.
एका मालिकेच्या प्रमोशनसाठी परचुरे नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत मोहन जोशी आणि विनय आपटे यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरू असून ते रंगभूमीच्या दृष्टीने चांगले नाहीत. खरे तर दोघेही रंगभूमीच्या क्षेत्रात ज्येष्ठ कलावंत आहेत. त्यामुळे वेगळा दृष्टीकोन ठेवून नवीन पिढी त्यांच्याकडे पाहत आहे, मात्र ज्या पद्धतीने सध्या वाद सुरू आहेत, ते पटणारे नाहीत. संस्थेमध्ये पद मिळविण्यापेक्षा आज रंगभूमीच्या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. नटांनी तर ही निवडणूक लढवू नये उलट ज्यांना रंगभूमीच्या विकासासाठी काम करायचे अशा कार्यकर्त्यांनी समोर येण्याची गरज आहे. निवडणुकीत जे नट निवडून येतात त्यांना नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या व्यस्ततेमुळे वेळ देता येत नाही. मालिकांमुळे फार वेळ देता येत नसल्यामुळे मराठी नाटकात काम करणे कमी केले असा त्याचा अर्थ नाही. एखादे चांगले कथानक मिळाले तर नाटकात काम करणार आहे. नाटकात म्हणावा तसा पैसा मिळत नाही. शिवाय एक नाटक करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो आणि आता मालिकांमुळे ते शक्य नाही. ‘वा गुरू वा’ या नाटकाचे २५ ते ३० प्रयोग केले आहेत. त्यापूर्वी पु.ल. देशपांडे यांचे ‘व्यक्ती आणि वल्ली’ या एकपात्री प्रयोगाचे शेकडो प्रयोग महाराष्ट्रात केले आहेत. हौशी रंगभूमीला सध्या चांगले दिवस आहेत. अनेक व्यावसायिक नाटक क्षेत्रात काम करणारे कलावंत हौशी रंगभूमीकडे वळले आहेत.