अष्टविनायकातील आद्यस्थान असलेल्या मोरगाव येथील मयूरेश्वराच्या अभिषेकासह सर्व ग्रामदैवतांचे पूजन करून मंगळवारच्या मध्यरात्री (११ डिसेंबर) १२ वाजून १२ मिनिटांनी नाटय़संमेलनाची नांदी होणार आहे. बारामती येथे होणाऱ्या आगामी नाटय़संमेलनाचे स्वागताध्यक्ष अजित पवार हे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे या प्रसंगी उपस्थित राहू शकणार नाहीत.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा वाढदिवस आणि १२-१२-१२ ही शतकातून एकदाच येणारी अनोखी तारीख, हा अनोखा योग साधून यंदाचे नाटय़संमेलन बारामती येथे होणार आहे. प्रत्यक्ष संमेलन २२ आणि २३ डिसेंबर या कालावधीत होत असले तरी, १२-१२-१२ चा मुहूर्त साधून संमेलनपूर्व संमेलनाची सुरुवात होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद बारामती शाखेचे अध्यक्ष आणि संमेलनाचे निमंत्रक किरण गुजर यांनी सांगितले.
११ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजून १२ वाजता मोरगाव, करंजे सोमेश्वर येथील सोमनाथ, सोनगाव येथील महादेव आणि शिर्सूफळ येथील शिरसाई देवी यांसह बारामती येथील ५५ ग्रामदैवतांचे पूजन करण्यात येणार आहे. १२ डिसेंबरच्या सकाळी दहा वाजता शारदा प्रांगण येथून शोभायात्रेची सुरुवात होणार असून दुपारी १२ वाजून १२ वाजता मोरोपंत वाडा येथे प्रतिमा पूजन होणार आहे.
नाटय़ परिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले, उपाध्यक्ष विनय आपटे, स्मिता तळवलकर, वंदना गुप्ते, अशोक हांडे या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. नटराज नाटय़ कला मंदिर संस्थेतर्फे राज्यस्तरीय एकांकिका महोत्सव सायंकाळी सात वाजता होणार असल्याचे किरण गुजर यांनी सांगितले.