प्रत्येक महिन्यात नाटय़ वाचनाचा कार्यक्रम अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या वतीने घेण्यात येईल, अशी माहिती परिषदेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी दिली आहे. परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीनंतर नेताजी भोईर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक शाखेची मासिक सभा झाली. नवीन लेखकांना प्रोत्साहन देणे, नवीन संहिता उपलब्ध करून देणे, यासाठी दर महिन्यास नाटय़ वाचनाचा तसेच नवीन एकांकिका वाचनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
१६ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वाजता नाटय़ परिषदेच्या सभागृहात मुकुंद गायधनी लिखित ‘वार्ताहर’ या दोन अंकी नाटकाचे वाचन होणार आहे. पत्रकाराच्या जीवनावर आधारित हे नाटक आहे. रसिकांनी बहुसंख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शिवाय परिषदेच्या कार्यालयात नाटय़ विषयाशी संबंधित नाटकावरील पुस्तके, संहिता यांचे ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे. त्याचा उपयोग रंगकर्मी व सभासदांना निश्चित होईल. पुढील वर्षांत नाटय़ चळवळीला जोमाने चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे ढगे यांनी जाहीर केले.
रंगकर्मीच्या अडचणी लक्षात घेऊन हौशी व प्रायोगिक एकांकिका, नाटकांच्या तालमीसाठी पूर्वीपेक्षा कमी दरात रंगकर्मीना जागा देण्यात येणार आहे.
मे महिन्यात अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा तसेच १० दिवसांचे प्रौढ नाटय़ शिबीर घेण्यात येणार आहे. याशिवाय नाटय़ प्रयोगासाठी अल्प दरात स्पॉट लाईट देण्याचाही परिषदेचा विचार आहे. नियामक मंडळाच्या निवडणुकीत सिद्धिविनायक पॅनलचे सुनील ढगे, राजेंद्र जाधव, सतीश लोटके, श्रीपाद जोशी यांचा विजय झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, रवींद्र ढवळे, चंद्रशेखर कुलकर्णी, प्रदीप पाटील, किशोर पाठक, स्वप्नील तोरणे आदी उपस्थित होते. नाटय़ वाचन, एकांकिका या कार्यक्रमात ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी प्रदीप पाटील- ९४२०८२७८७०, किशोर पाठक-९४२२२५६९०२, मुकुंद गायधनी- ९९६०३३१६४३ यांच्याशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा