बॉलीवूडची ग्लॅमरस नायिका म्हणून तिच्यावर कधीच शिक्कामोर्तब झाले आहे. तिला हिंदी अजिबात येत नाही. अभिनयाच्या बाबतीतही ती कच्चीच आहे, अशी टीका तिच्यावर सतत होत असते. आणि तरीही ‘एक था टायगर’सारखा सलमानबरोबरचा रेकॉर्डब्रेक नफा कमावणारा चित्रपट, ‘यशराज’ची नायिका म्हणून शाहरूख खानबरोबर ‘जब तक है जान’ आणि पुढच्या वर्षी यशराज बॅनरसाठीच आमीर खानबरोबर ‘धूम ३..’ तिच्या चित्रपटांची यादी वाढतेच आहे. यश चोप्रांच्या चित्रपटांतील नायिका होण्याचे तिचे स्वप्न ‘जब तक है जान’ या चित्रपटामुळे पूर्ण होते आहे. वीक पॉईण्टच्या निमित्ताने तिच्या या स्वप्नांविषयी, जब तक है जान आणि दिग्दर्शक यश चोप्रा, सलमानसह तिचे सहकारी उडवत असलेली थट्टा अशा अनेक गोष्टींवर तिच्याशी मारलेल्या गप्पा..
*  एक था टायगरच्या यशानंतर तुझी इंडस्ट्रीतली नंबर वन नायिका म्हणून ओळखली जाते आहेस. चित्रपट कारकिर्दीतील या सर्वोत्तम स्थानावर राहणं तुला कसं वाटतं..
‘एक था टायगर’ हा चित्रपट खूप वेगळा होता. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर निर्मिती आणि चित्रीकरण करण्यात आलेला हा चित्रपट होता. त्याचबरोबर त्याची कथा, त्याला दिग्दर्शक कबीर खानने दिलेली वागणूक या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. आणि नायिका म्हणून यात प्रेम, गाणी, अ‍ॅक्शन सगळ्याच गोष्टी करायच्या होत्या. त्यामुळे हा चित्रपट करताना एक वेगळा उत्साह होता. त्या चित्रपटाला यश मिळणार हेही आम्हाला पक्के ठाऊक होते. तसे ते मिळालेही. नंबर वन वगैरेपेक्षाही असे वेगवेगळे चित्रपट करायला मिळत आहेत, हे मला खूप महत्त्वाचे वाटते. पुढचे चित्रपटही तसेच वेगळे असल्याने एकंदरीतच मी उत्सुक आहे.

*  ‘जब तक है जान’ या चित्रपटासाठी यश चोप्रांनी तुझा विचार कसा काय केला?
 माझे काही चित्रपट विशेषत ‘एक था टायगर’ पाहिल्यानंतर यश चोप्रांनी माझ्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. जेव्हा ‘जब तक है जान’चे काम सुरू झाले तेव्हा त्यांनी मला भूमिकेची कल्पना दिली. यशजींना नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांच्याबरोबर काम करणे हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक नायिकेचे स्वप्न असते. पण, गेल्या काही वर्षांत त्यांनी दिग्दर्शन करणेच थांबवले होते. त्यामुळे त्यांच्या चित्रपटात काम करण्याची शक्यताच उरली नव्हती. ‘जब तक है जान’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर काम करण्याची संधीच माझ्याकडे चालून आली होती. आणि खरोखरच ‘जब तक है जान’ हा चित्रपट म्हणजे माझे स्वप्न सत्यात उतरल्यासारखेच आहे.

*  ‘जब तक है जान’ चित्रपटाची नेमकी कथा काय आहे..
 मी कथाच सांगून टाकली तर चित्रपट पाहण्यातली गंमत निघून जाईल.. मी माझ्या भूमिकेविषयी बोलू शकते. मी या चित्रपटात मीराची भूमिका करते आहे. आणि नावाप्रमाणेच तिचं प्रेम हे मीरेसारखं आहे. एकाकी आणि संपूर्ण समर्पित प्रेमभावना मीरामध्ये आहे. यशजींनी तिचं नाव मीरा ठेवताना कृष्ण आणि मीरा यांच्यातलं जे नातं आहे तेच डोळ्यासमोर ठेवलं असावं..

* या चित्रपटातील दुसऱ्या नायिकेचे नाव ‘अकिरा’ आहे, हे नाव थोडेसे रशियन वाटते..अशी नावं निवडण्यामागे काही वेगळा अर्थ होता का..
 अशी वेगळी नावं निवडण्यामागे देश, धर्म असा काही विचार केलेला नाही. अकिराची भूमिका अनुष्का शर्माने केली आहे. अकिरा म्हणजे एक स्वतंत्र विचारांची, उत्साहाचा खळखळता धबधबा असलेली आणि कुठलंही बंधन, संकट यांना न जुमानता, कुठल्याही चौकटीत न अडकता मनमुक्तपणे वावरणारी आधुनिक मुलगी असा अर्थ यशजींना अभिप्रेत होता, असं मला वाटतं. पण, खरं म्हणजे फक्त नावांवरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचे अर्थ लावत बसणं मला योग्य वाटत नाही. दिग्दर्शकाने ती व्यक्तिेरखा पडद्यावर कशी उभी केली आहे आणि ती तशी का उभी केली आहे, हे पाहणं महत्त्वाचं असतं.
*  दोन अभिनेत्री एका चित्रपटात असल्या की सहसा त्यांचं पटत नाही म्हणतात. तुझा अनुष्काबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता?
– असं काही नसतं. अनुष्काबरोबर काम करताना खूप मजा आली. तिनेही याआधी यशराज बॅनरबरोबर चांगले चांगले चित्रपट केलेले आहेत. आणि हा पूर्णत यशजींचा चित्रपट असल्याने सेटवर एक वेगळा माहोल तयार झाला होता. एक अफलातून केमिस्ट्री निर्माण झाली होती त्यामुळे वादविवाद वगैरे होण्याचा प्रश्नच नव्हता.
* तू साकारलेली मीरा ही यशजींच्या टिपिकल पठडीतील नायिका आहे का..
– यशजींच्या नायिका हा खरोखरच वेगळा विषय आहे. त्यांनी आजवर केलेल्या चित्रपटातील प्रत्येक नायिकेला आपलं असं वेगळं व्यक्तिमत्त्व होतं, तिला स्वतचे असे विचार होते. तिच्या वागण्या-बोलण्याची पद्धत या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींवर यशजींचा भर असायचा. तसा तो मीरा आणि अकिरा या दोन व्यक्तिरेखांच्याही बाबतीतही यशजींनी केलेला होताच. त्यामुळे मीरा साडी कोणती नेसणार?, कोणत्या रंगाची नेसणार?, याबद्दल त्यांची अशी आग्रही मतं होती. त्यावरून त्यांच्यात आणि माझ्यात वादही झाले. म्हणजे अमूक एक रंग मला खुलून दिसणार नाही, असा माझा मुद्दा असायचा. पण, तो मीरासाठी कसा आवश्यक आहे हे ते पटवून द्यायचा प्रयत्न करायचे. आणि ते किती बरोबर होते याची जाणीव मला नंतर चित्रपट पाहताना झाली.

*  यश चोप्रांच्या चित्रपटात काम करायचे म्हटल्यावर तू काही वेगळी तयारी केली होतीस का?
– यश चोप्रांची दिग्दर्शनाची शैलीच वेगळी आहे. मी आधीही त्यांचे चित्रपट पाहिले होते. आणि ‘जब तक है जान’ स्वीकारल्यावर तर जाणीवपूर्वक पाहिले. प्रत्येक चित्रपट पाहत असताना त्यातून दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचं आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करते. यशजींबरोबर काम करतानाही त्यांना एखाद्या दृश्यातून नेमकं काय दाखवायचं आहे हे समजून घेऊन मग ते दृश्य साकारण्यावर माझा भर होता. त्यांच्याबरोबर काम करताना मला खूप काही शिकायला मिळालं. दिग्गज दिग्दर्शक म्हणून त्यांचा जो लौकिक आहे तो किती सार्थ आहे, याची प्रचिती मी घेतली. दुर्दैवाने, त्यांच्याबरोबर हा चित्रपट आता पाहता येणार नाही. चित्रपट त्यांनी स्वत आधी पाहिला होता आणि तो त्यांना खूप आवडलाही होता. तेवढेच एक समाधान आहे.

* सलमान, शाहरूख खान प्रत्येक कार्यक्रमात तुझी थट्टा करतात, तू कधीच काही बोलत नाहीस..
-चित्रपट हे मनोरंजनाचं माध्यम आहे. लोकांना चटपटीत संवाद, मजामस्करी असंच सगळं हवं असतं. त्यामुळे एखाद्या रटाळ कार्यक्रमात किंवा पत्रकार परिषदेत ते माझ्यावर विनोद करून त्यात थोडी जान आणत असतील, तर मला त्यात काही गैर वाटत नाही. दुसरं म्हणजे सलमान किंवा शाहरूख यांच्याबरोबर माझी घट्ट मैत्री आहे. ते मला काय चिडवतात, किती चिडवतात याची मला माहिती आहे. त्यामुळे उगाचच म्हणून त्यांच्यापैकी कोणी माझी टर उडवत नाही याची मला खात्री आहे.

*  चित्रपटसृष्टीतील खान त्रिमूर्तीबरोबर तू काम केलं आहेस. तुझी जोडी खऱ्या अर्थाने कोणाबरोबर जमली असं तुला वाटतं?
– तुम्ही मोठमोठे कलाकार, बॅनर्सबरोबर काम केलं की तुमची खूप चर्चा होते. पण, माझ्याबाबतीत म्हणायचं झालं तर अक्षय कुमारबरोबर माझी जोडी खऱ्या अर्थाने जमली. अक्षयबरोबरचे माझे चित्रपट सर्वाधिक हिट ठरले आणि त्यामुळे मला इथे माझे स्थान टिकवता आले. ‘वेलकम’, ‘सिंग इज किंग’ सारखे चित्रपट केवळ विनोदी असल्याने तुमच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचे नसतीलही पण हे चित्रपट करत असताना अक्षयने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. त्यामुळे माझ्या कारकिर्दीत हे चित्रपट महत्त्वाचेच आहेत.

* तुझ्याविषयी थोडंसं..
मी लंडनमध्येच जन्माला आले आणि तिथेच लहानाची मोठी झाले. माझ्या आईवडिलांची मी लाडकी मुलगी होते कारण लहानपणापासूनच मी एक शिस्तीची मुलगी आहे. घरातली कामं करणं, पुस्तक वाचणं अगदी घराची साफसफाई करणं हे माझे छंद आहेत. त्यामुळे आईला लहानपणापासूनच माझा अभिमान वाटत आला आहे.

*  तुझा वीक-पॉईण्ट काय आहे असं तुला वाटतं..
मी लहानसहान गोष्टींचाही खूप विचार करत बसते, हाच मला माझा वीक-पॉईण्ट वाटतो.