सोलापूर जिल्हय़ासह पंढरपूर तालुक्यामध्ये वित्तपुरवठा करणाऱ्या अर्बन बँकेने शताब्दी वर्षांच्या निमित्ताने २० व २१ ऑक्टोबर असे दोन दिवस ‘ड्रीम जॉब फेअर’चे आयोजन केले आहे. यात सुमारे तीन हजार युवक-युवतींना नोकरी उपलब्ध करून देणार आहोत, असे अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी सांगितले.
स्टेशन रोडवरील टिळक स्मारक मंदिराच्या पटांगणात ड्रीम जॉब फेअरचे आयोजन केले आहे. त्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे अधिकारी हजर राहून मुलाखती घेणार आहेत. या फेअरचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकर परिचारक हे करणार आहेत. या ड्रीम जॉब फेअरमध्ये विविध ५० कंपन्यांचा सहभाग असून यात सातवी ते पदवीधर तसेच , डिप्लोमाधारक यांना संधी मिळणार आहे. येताना तीन पासपोर्ट साईज फोटो तीन प्रतींत बायोडाटा, १०० रुपये शुल्क आवश्यक असून पाच उमेदवारांस जागेवर नोकरीची ऑर्डर देण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी अर्बन बँक, सातपुते यांच्याशी संपर्क साधावा, असे अर्बन बँकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. पुढील महिन्यात अर्बन बँकेस शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने बँकेने विविध शाखांमार्फत समाजोपयोगी उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेतले आहेत. लातूर अर्बन बँक शाखा व बार्शी अर्बन बँक शाखा यांच्या वतीने मेळावा आयोजित केला होता. तर पंढरीत मोफत हृदयरोग निदान शिबिर, आरोग्य शिबिर असे कार्यक्रम आयोजित केले होते.
अर्बन बँक शताब्दी वर्षांच्या निमित्ताने नागरिकांसाठी पंढरीत अजय-अतुल यांच्या गाण्यांचा कार्यक्रमही ठेवला आहे. त्यामुळे अनेक कलाकार पाहण्याची संधीही मिळणार आहे. आपण समाजाचे देणे लागतो ही भावना ठेवून ड्रीम जॉब फेअरचे आयोजन केले आहे. यातून अनेकांना नोकरी मिळणार आहे असे प्रशांत परिचारक यांनी सांगितले.