जायकवाडी धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडे नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. तसेच पाणी वाटपाचे निर्णय मंत्रालयात परस्पर घेतले जातात. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली बिल्डरला पाणी देण्याचे उद्योग केले जातात, हे दुर्देव असल्याची टीका कृषीमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता ही टीका केली असली तरी विखे यांचा रोख त्यांच्याच दिशेने होता.
मातापूर (ता. श्रीरामपूर) येथील ग्रामपंचायतीने गेल्या दोन वर्षांत केलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ विखे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी माजी आमदार जयंत ससाणे होते. यावेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, बाजार समितीचे सभापती दीपक पटारे, माजी सभापती नानासाहेब पवार, भूविकास बँकेचे संचालक रामभाऊ लिप्टे, सरपंच पल्लवी दौंड, उपसरपंच अनिल उंडे होते.
विखे पुढे म्हणाले, जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास आपला विरोध नव्हता. पण, राजकीय दृष्टीकोनातून या प्रश्नाकडे पाहिले गेले. काहींनी समाजाचे दायित्व विसरून गप्प राहणे पसंत केले. तर काहींनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. जायकवाडीच्या पाण्याचे नियोजनच नव्हते. जायकवाडीत पाणी सोडण्याची परिस्थिती का उद्भवली, याचा विचार केला गेला नाही. शेतीचे पाणी काढून ते उद्योगाला दिले जात आहे. नाशिक विभागात बिगर सिंचनाचे आरक्षण ५२ टक्क्यांवर पोहचले आहे. त्यामुळे पुढील विस वर्षांत १५ टक्केच पाणी शेतीला मिळेल. मंत्रालयात निर्णय घेताना शेतीचे पाणी कमी केले गेले. ते उद्योगाला दिले. शेतीला तिसऱ्या तर उद्योगाला दुसऱ्या क्रमांकाचा प्राधान्यक्रम दिला. त्याला आपण विरोध केला होता. मुठभर पुंजीपतींचे हीत जोपासण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली बिल्डरला पाणी देण्याचे उद्योग सुरू आहेत. त्यांना सवलती दिल्या जात आहेत. ६२ टक्के जनता शेतीवर अवलंबून असून त्यांचे हीत कधी पाहणार, असा सवाल करून पूर्वेकडे वाया जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी नगर, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र बसून विचार करावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी बाबा महाराज उंडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बाळासाहेब दोंड, आमदार कांबळे, ससाणे, सचिन गुजर यांची भाषणे झाली. कार्यक्रमास जि. के. बकाल, राजन भल्ला, बाबासाहबे दिघे, प्रांताधिकारी सुहास मापारी, गटविकास अधिकारी परिक्षीत यादव, बापुसाहेब उंडे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या कामात गोंधळ
जिल्हा परिषदेच्या कामकाजात सध्या गोंधळ असून त्याचा फायदा काही मंडळी घेत आहेत. प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याकरीता अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी त्यात लक्ष घातले पाहिजे, जिल्हा परिषद बदनाम होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगून विखे म्हणाले, नगर जिल्हा परिषदेला उज्वल परंपरा आहे. गेल्या पाच वर्षांत चांगले काम झाले. पण आता हे काम होताना दिसत नाही. याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.
पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली बिल्डरांना पाणी देण्याचे उद्योग
जायकवाडी धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडे नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. तसेच पाणी वाटपाचे निर्णय मंत्रालयात परस्पर घेतले जातात. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली बिल्डरला पाणी देण्याचे उद्योग केले जातात, हे दुर्देव असल्याची टीका कृषीमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.
First published on: 02-04-2013 at 01:10 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drinking water wastage by builders lobby