तीव्र पाणीटंचाईच्या काळात महापालिकेतून पाण्याचा टँकर भरून तो खासगी उद्योजकांना दिल्याचे उघडकीस आल्याने महापालिकेचे चालक बबन राठोड याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
गुरुवारी एन ५ येथील जलकुंभावरून उत्तरानगरीत पाणीपुरवठा करण्यासाठी भरलेले टँकर चिखलठाणा एमआयडीसीतील हॉरिझॉन कोल्ड स्टोरेजच्या उत्तर बाजूच्या हौदात टाकण्यात आले. एकीकडे नागरिकांचे प्रचंड हाल होत असतानाही महापालिकेतील कर्मचारी परस्पर पाणीविक्री करीत असल्याचे उघडकीस आले. एमआयडीसीमधील हॉरिझॉन कोल्ड स्टोरेजच्या बाजूला हमसफर ट्रॅव्हल्सच्या अनेक गाडय़ा थांबतात. त्यांना पाणी दिल्याची तक्रार काही सुजाण नागरिकांनी केली. चौकशीअंती हे उघडकीस आल्याने राठोड यांना निलंबित करण्याचे आदेश महापालिका आयुक्ता डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिले आहेत.  शहरातील खुल्या विहिरींचे सर्वेक्षणही हाती घेण्यात आले. ३२३ खुल्या विहिरींपैकी ४३ खुल्या विहिरींवर विद्युत पंप बसविण्यात आले. हे पाणी इतर वापरासाठी उपलब्ध केले जाणार आहे. हर्सूल गाव, मुर्गी नाला, सिंगापूर कॉम्प्लेक्स, मिटमिटा, एन ९, संतोषी मातानगर, तानाजीनगर, संघर्षनगर, चिखलठाणा, कुंभारवाडा, येथील विहिरींमधून सांडपाणी टँकरद्वारे दिले जाणार आहे.
याशिवाय  गुंठेवारी भागात ४९ टँकरद्वारे ३२५ ते ३५० टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत. हर्सूल, चिखलठाणा, मिटमिटा भागातील विहिरींचा गाळ काढणे ही कामे घेण्यात आली आहेत. तसेच जायकवाडी जलाशयातील आपत्कालीन पंपगृहाजवळ पाणी उपलब्ध व्हावे, या साठी ४८७ कोटींची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे शहराला दर दोन दिवसाला पाणीपुरवठा केला जाईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कळविले आहे. दरम्यान, शहरातील गाडय़ा धुण्याचे सेंटर बंद करावेत, अशी सूचना रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आली.

Story img Loader