उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या द्रोणागिरी डोंगराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तळाशी असलेल्या मातीचे उत्खनन व डोंगरमाथ्यावर सुरू असलेले अतिक्रमण यामुळे पौराणिक, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या डोंगरातील माती व मुरूम सरकू लागले असून, त्यामुळे दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा डोंगर उरणची संरक्षण भिंत असल्याने त्याच्या पायथ्याशी होणारे उत्खनन तसेच अतिक्रमण थांबविण्याची मागणी येथील अनेक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या संदर्भात तहसील कार्यालयाकडून दरडीचा धोका असलेल्या परिसराचे सर्वेक्षण सुरू असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावालगतचा डोंगर कोसळल्याने संपूर्ण गाव नामशेष झाल्याची घटना गेल्या वर्षीच्या पावसात घडली आहे. उरण करंजा येथील द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जमिनीचेही सपाटीकरण करण्यासाठी डोंगर पोखरला जात आहे, तसेच डाऊरनगरसारख्या ठिकाणी डोंगर माथ्यावरील झाडांची कत्तल करून घरे बांधण्यासाठी अतिक्रमण सुरू आहे. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्यांबरोबरच शेजारील गावालाही दरडीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. द्रोणागिरी डोंगराचे संरक्षण करण्याची मागणी उरण सामाजिक संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे सात ते आठ वर्षांपासून केली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिली. उरणच्या द्रोणागिरी डोंगराचे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. तसेच या डोंगराच्याच कुशीत देशाच्या तेल उद्योगातील नवरत्नांपैकी एक असलेल्या ओएनजीसीचा देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्यामुळे या डोंगराचे अस्तित्व टिकून राहणे हे महत्त्वाचे आहे. या डोंगराच्या पायथ्याशी असलेला महसूल विभाग तसेच सिडकोच्या जमिनींवर अतिक्रमणे करण्यात आलेली आहेत. या अतिक्रमणाचा वेग आता वाढू लागला आहे. त्यामुळे द्रोणागिरीलाच धोका निर्माण झाला असून, अतिक्रमणाच्या वेळी डोंगर पोखरला जात असल्याने दरडी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, द्रोणागिरीवरील अतिक्रमण थांबविण्यासाठी महसूल विभागाकडून लक्ष दिले जात आहे. त्याचप्रमाणे द्रोणागिरीचे कायमस्वरूपी उत्खनन थांबवावे याकरिता तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तीन महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उरणमधील संभाव्य धोकादायक भागांची निश्चिती करून या परिसराची भूगर्भ विभागाकडून तपासणीही करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अतिक्रमणामुळे द्रोणागिरीला दरड कोसळण्याचा धोका?
उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या द्रोणागिरी डोंगराचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-06-2015 at 08:02 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dronagiri landslide risk due to enchroachment