विकास साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनेंतर्गत कार्यक्षेत्रातील सभासदांसाठी ठिबक सिंचन योजना जाहीर केल्याचे शेतकरी मेळाव्यात सांगण्यात आले. चालू ऊस हंगामात खोडवा व नवीन ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचनाची योजना आहे. लाभधारकांनी यासाठी १० टक्के निधी द्यावा, उर्वरित पैसे कारखान्यातर्फे कर्जाऊ पद्धतीने उपलब्ध केले जाणार आहेत. ज्येष्ठ ऊसतज्ज्ञ डॉ. संपतराव जाधव यांनी शेतकऱ्यांनी अवर्षण स्थितीत घाबरून न जाता खोडव्याचा ऊस जगवण्याचे तंत्र आत्मसात करावे, असे या वेळी सांगितले. पुढील वर्षी ऊस व साखरेला चांगला भाव मिळणार आहे. विकास कारखान्याने कायमच शेतकरी हिताची भूमिका घेतली आहे. कमीत कमी पाण्याचा वापर करून आहे तो ऊस कसा जगवता येईल, याचे ज्ञान शेतकऱ्यांनी मिळविले पाहिजे. त्याचा मोठा लाभ होणार असल्याचे कार्यकारी संचालक बोखारे यांनी सांगितले. मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे एस. एल. कोकाटे उपस्थित होते.