गावी लग्न असेल किंवा शाळेची सहल असेल, तर नातेवाईक आणि मित्र यांच्या बरोबरीने लक्षात राहते ती एसटीची लाल डब्बा गाडी! अशा सहली किंवा सोहळे यांच्यासाठी आपल्या गाडय़ा भाडय़ाने देणाऱ्या एसटीला यातून चांगलेच घसघशीत उत्पन्न मिळते. मात्र यंदा एसटीच्या या उत्पन्नात तब्बल ४५ ते ५० टक्के एवढी जबरदस्त घट झाली आहे. राज्यातील दुष्काळ आणि लग्नांच्या मुहूर्ताची गडबड या दोन प्रमुख कारणांमुळे एसटीचे हे उत्पन्न घटल्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि एसटीचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी स्पष्ट केले.
खासगी सोहळे, सहली, लग्न समारंभ अशा कार्यक्रमांसाठी एसटी आपल्या गाडय़ा काही भाडे आकारून उपलब्ध करून देते. त्याला प्रासंगिक किंवा नैमित्तिक करार म्हणतात. हा करार करताना एसटीचे संपूर्ण भाडे आगाऊ घेतले जात असल्याने एसटीसाठी हा सौदा फायद्याचा असतो. एखाद्या मार्गावर कमी उत्पन्न देणारी गाडी अशा कार्यक्रमांसाठी दिल्यास तिचे शंभर टक्के उत्पन्न महामंडळाला मिळते. त्यामुळे अशा प्रकारे गाडय़ा भाडय़ाने देण्यावर एसटीने काही वर्षांपासून भर दिला आहे. एसटी महामंडळ हे विश्वासार्ह असल्याने लोकही एसटीला पसंती देतात. त्याशिवाय एसटीचेच अनुभवी चालक या गाडीबरोबर असतात.
एसटीच्या गाडय़ा एका दिवसासाठी भाडेतत्त्वावर दिल्या जातात. या एका दिवसाचे भाडे गाडीच्या दर्जाप्रमाणे बदलते. २><२ परिवर्तन या गाडीचे एका दिवसाचे भाडे ७१०० रुपये आहे. तर हिरकणी गाडीचे भाडे ९६०० रुपये आणि वातानुकूलित शिवनेरीचे भाडे ४१,००० रुपये आहे. एकदा हे भाडे भरल्यानंतर गाडी एका दिवसात ३०० किलोमीटपर्यंत प्रवास करू शकते. त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी प्रत्येक गाडीच्या दर्जाप्रमाणे दर आकारले जातात. त्यात अधिकृत शाळा व महाविद्यालये यांच्या सहलींसाठी ५० टक्के सवलतही दिली जाते. एसटीला या उपक्रमातून दरवर्षी ३५ ते ४० कोटी उत्पन्न मिळते, असे कपूर यांनी सांगितले.
मात्र २०१२-१३ या आर्थिक वर्षांत एसटीला या उपक्रमातून फक्त १५ ते १८ कोटींचीच कमाई झाली. यंदा संपूर्ण महाराष्ट्राने भयंकर दुष्काळाला तोंड दिले. त्यामुळे लोकांनी प्रवासाला पसंती देण्याऐवजी मूलभूत गरजा भागवण्यावर भर दिला. एसटी भाडय़ाने घेऊन लग्नसमारंभाला जाणे, ही चैन झाली नाही. याच दुष्काळामुळे यंदा ग्रामीण भागातील शाळांनी सहलीही नेल्या नाहीत. त्यामुळेही एसटीला असलेली मागणी घटली. दुसऱ्या बाजूला यंदा जानेवारी ते मार्च या काळात लग्नाचे मुहूर्त खूपच कमी होते. त्यामुळे त्याचा फटकाही आम्हाला बसल्याची कबुली कपूर यांनी दिली. एसटी भाडय़ाने देत उत्पन्न वाढवण्यावर प्रत्येक आगाराने भर द्यायला हवा, अशा लेखी सूचनाच प्रशासनाने आगारांना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात हे उत्पन्न पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.

Story img Loader