करमाळय़ात महेश चिवटे यांचा उपक्रम
शेतकऱ्यांच्या विशेषत: ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक पद्धतीने लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने करमाळा तालुक्यात रणांगणावरील लढाईबरोबर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रचनात्मक कार्यक्रमही हाती घेतला आहे. संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश चिवटे यांनी पिण्याच्या पाण्यासाठी स्वत:ची विहीर खुली केली असून, एका शेतकऱ्याच्या पाण्याअभावी जळू लागलेल्या दोन एकर डाळिंबाच्या बागेलाही दररोज दोन टँकर पाणी उपलब्ध केले आहे.
करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे महेश चिवटे यांनी आपल्या स्वत:च्या मालकीची शेती ओलिताखाली आणण्यासाठी पाच महिन्यांपूर्वी पाच पुरुष खोलीची विहीर खोदली होती. या विहिरीला भरपूर पाणी लागले. दरम्यान, दुष्काळ आणि पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन चिवटे यांनी स्वत:च्या शेतात पीक घेण्याऐवजी हिवरवाडीसह आसपासच्या रावगाव, भोसे, रोसेवाडी आदी गावांना पिण्यासाठी मोफत पाणी देण्याचा निर्णय घेतला.
तसेच भोसे येथील शेतकरी एच. आर. पाटील यांच्या पाण्याअभावी जळू लागलेल्या दोन एकर डाळिंबाच्या बागेला जगविण्यासाठी दररोज दोन टँकर पाणी उपलब्ध केले आहे. त्यामुळे एवढय़ा भीषण दुष्काळातदेखील पाटील यांची डाळिंबाची बाग तग धरून आहे. त्याचप्रमाणे आसपासच्या चार गावांची व वाडय़ावस्त्यांची पाण्याची गरज भागली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून चिवटे यांचा हा लोकोपयोगी उपक्रम मोफत स्वरूपात सुरू आहे.
महेश चिवटे यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी त्यांचा कुर्डूवाडी येथे विश्रामगृहावर सत्कार करून त्यांना सन्मानित केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा