आदिवासीबहुल नंदुरबारसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात होलिकोत्सवाची तयारी पूर्णत्वास गेली असली तरी यंदा या सणावर दुष्काळी स्थितीचे सावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. धार्मिक सणांची परंपरा राखताना पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, याकरिता काही लोकप्रतिनिधी आणि पर्यावरणवादी संस्था पुढे सरसावल्या आहेत. वृक्षतोड टाळण्यासाठी होळीसाठी लाकडाचा वापर न करता गवऱ्यांचा प्रामुख्याने वापर करावा, असे आवाहन संबंधितांनी केले आहे. तथापि, गवऱ्यांच्या मागणीत कमालीची वाढ झाल्यामुळे त्यांची किंमत चांगलीच कडाडली आहे. सातपुडा पर्वतराजीत होळीला दिवाळी सणाइतकेच महत्त्व असून राजेशाही थाटातील होलिकोत्सवासाठी आदिवासी बांधव सज्ज झाला आहे.
यंदा होळी, धूलिवंदन व रंगपंचमी या सणांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. नाशिकसह धुळे, जळगाव व नंदुरबारमध्ये होलिकोत्सवाची तयारी केली जात असली तरी नेहमी दिसणारा उत्साह मात्र लोप पावल्याचे दिसत आहे. शहर व परिसरात बच्चे कंपनीकडून होळीची तयारी आदल्या दिवशीपासून सुरू झाली. होळीत लाकडाचा वापर टाळण्यासाठी गवरींचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. यामुळे त्यांच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. नाशिक शहरात गवऱ्यांचे दर ५०० रुपये शेकडय़ावर पोहोचल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी अर्थात वृक्षतोड रोखण्यासाठी गवऱ्यांचा वापर करावा तसेच पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून रंगपंचमी कोरडय़ा पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पोलीस यंत्रणेने केले आहे. नाशिकचे महापौर अॅड. यतीन वाघ यांनीही होलिकोत्सवात गवऱ्यांचा वापर करून धार्मिक परंपरेचे जतन करावे, असे आवाहन केले आहे. पर्यावरणाचे संतुलन व धार्मिक सणांची परंपरा या दोघांचा समतोल साधणे आवश्यक आहे. सार्वजनिक मंडळांनी रंगपंचमीतून होणारी बचत दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून द्यावी, असे अॅड. वाघ यांनी म्हटले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींचा होळी हा पारंपरिक पण जिव्हाळ्याचा सण! नंदुरबार व धुळे जिल्हय़ात भिल्ल, पावरा, कोकणी, मावची, धानका या आदिवासी जमातींची मोठय़ा प्रमाणात वस्ती आहे. त्यांच्या जीवनात ‘होळी’ हे आनंदपर्व असून त्याला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने सतत पाच दिवस गावागावांत पारंपरिक नृत्य आणि लोकसंगीताची अनोखी मेजवानी झडते. परगावी नोकरीसाठी गेलेले सुशिक्षित तरुणही होळीसाठी आपल्या गावी परतले आहेत.
नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील अनुक्रमे गणोर, मांडवी, काठी, डाब, असली, आमलीबारी येथील होळ्या प्रसिद्ध आहेत. पूर्वी भिल्ल लोकांची संस्थाने होती. त्यातील पहिले संस्थान ‘दाब’ अथवा ‘डाब’ होय. पूर्वी एकच राज्य होते. त्यानंतर काठी, सिंगसपूर, रायसिंगपूर, नाला, सागरबारा, गंठा, भगदरी वगैरे संस्थाने झाली. आदिवासींचे प्रमुख कुलदैव याहामोगी, राजा पांढा, गांडो ठाकूर. दिवाळी व होळी याचे संदर्भ या गावाशी जोडले जातात. येथील होळी प्रसिद्ध आहे, परंतु अलीकडे काठी या संस्थानच्या होळीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. संस्थानिकांची ही होळी पहाटे पाच वाजता पेटविली जाते.
ही होळी उंच अशा बांबूची असते. होळीसाठी लागणारा बांबू प्रथा व परंपरेनुसार गुजरात राज्याच्या जंगलातून आणला जातो. तो मानही विशिष्ट लोकांचा असतो. या होळीसाठी पाडय़ापाडय़ातील आदिवासी बांधव आपल्या ढोलपथकांसह दाखल होतात आणि रात्रभर पांरपरिक नृत्य सादर करीत असतात. त्यांच्या रंगबेरंगी पोषाखांनी, पारंपरिक विविध वाद्यांच्या नादस्वरांनी मंगळवारी रात्रीपासून या भागातील वातावरण भारावून जाणार आहे.
टंचाईच्या सावटाखाली होळी
आदिवासीबहुल नंदुरबारसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात होलिकोत्सवाची तयारी पूर्णत्वास गेली असली तरी यंदा या सणावर दुष्काळी स्थितीचे सावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. धार्मिक सणांची परंपरा राखताना पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, याकरिता काही लोकप्रतिनिधी आणि पर्यावरणवादी संस्था पुढे सरसावल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-03-2013 at 12:11 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drought imapct on north maharstra holi