जिल्ह्य़ातील १५ पैकी आठ तालुक्यांत दुष्काळी स्थिती असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच शासनाकडे पाठविला होता, मात्र अंतिम आणेवारीनंतर वास्तव पुढे आले असून, दुष्काळी तालुक्यांच्या संख्येत आणखी चार तालुक्यांची भर पडली आहे. जिल्ह्य़ात एकूण ११७९ गावांत दुष्काळ असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असून, या सर्व गावांना आता शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या टंचाई उपाययोजनांचा लाभ मिळणार आहे.
जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अंतिम आणेवारीत १२ तालुक्यांतील तब्बल ११७९ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षाही कमी आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच हंगामी आणेवारीनुसार आठ तालुके दुष्काळी असल्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला होता. जिल्ह्य़ातील यावल, रावेर आणि चोपडा यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करण्यात आलेला नाही. या तालुक्यांना वगळता जिल्ह्य़ातील एकूण १४७६ गावांपैकी १२ तालुक्यांतील ११७९ गावे दुष्काळग्रस्त असल्याचे प्रशासनाने आता जाहीर केले आहे. त्यात अमळनेर तालुक्यातील सर्वाधिक १५४ गावांचा समावेश आहे. ५० पैशांच्या आत आणेवारी असलेली गावांची संख्या पुढीलप्रमाणे-जामनेर १५२, चाळीसगाव १३६, पारोळा ११४, पाचोरा १२८, जळगाव ९२, धरणगाव ८९, मुक्ताईनगर ८१, भडगाव ६३, एरंडोल ६५, भुसावळ ५४ आणि बोदवड तालुक्यातील ५१ गावे समाविष्ट आहेत.