दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडे तयार असलेल्या आराखडय़ाची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना माहितीच नसल्याचे सोमवारी येथे त्यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यावरून स्पष्ट झाले.
जिल्हा प्रशासनाकडे पाणीपुरवठा, तसेच रोजगार हमी कामांसंदर्भात जुलैपर्यंत आराखडा तयार आहे. परंतु असे असतानाही ठाकरे यांनी, ‘मे-जूनपर्यंतच्या टंचाईचे नियोजन आताच केले पाहिजे. एवढेच नव्हे तर या संदर्भात आताच नियोजन करण्याची सूचना आपण मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे’ सांगितले. जिल्ह्य़ातील भायडी, जानेफळ, पंडित, दाणापूर, राजूर आदी भागातील दुष्काळी स्थितीची पाहणी केल्यावर ठाकरे म्हणाले, की जालना जिल्ह्य़ातील पाणीपुरवठय़ाचे उद्भव कोरडे पडत असून पुढील काळात तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे. चारा छावण्या सुरू करण्याचे नियम सरकारने शिथिल केले असून सामाजिक संस्था व स्वयंसेवी संस्थांनी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी अपेक्षा आहे. रोजगार हमीची कामे काढण्याच्या सूचना आहेत. टंचाईकाळात अधिकाऱ्यांनी जनतेची अडवणूक न करता नियमानुसार काम करण्याची गरज आहे. पाणीपुरवठय़ाचे स्रोत आणखी कोठे आहेत, हे पाहून ठेवावे.
स्थानिक आमदार कैलास गोरंटय़ाल यांनी येत्या शुक्रवारी (दि. ८) मुख्यमंत्री दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले.
 थेट जायकवाडीवरून जालना शहरासाठी हाती घेतलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेस पाणीपुरवठा करण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे वीजबिल थकबाकीमुळे निर्माण झालेल्या या प्रश्नातून मार्ग निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष भीमराव डोंगरे, जालना शहराध्यक्ष अब्दुल हफीज, माजी आमदार विलास खरात, आर. आर. खडके, राम सावंत, गजानन डंक, माजी आमदार धोंडिराम राठोड आदींची उपस्थिती होती.
माणिकरावांचे अज्ञान!
मे-जूनचा टंचाई निवारण आराखडा आताच तयार करण्याची गरज असून त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना सूचना करणार असल्याच्या माणिकराव ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबतचा आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला असून पाणीटंचाई, रोजगार हमी आदींबाबतचे नियोजन येत्या जुलैपर्यंत तयार असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

Story img Loader