संतोष माने नावाच्या मनोरुग्ण चालकाने पुण्यात स्वारगेट एसटी बसस्थानकातून एसटी बस बाहेर काढून रस्त्यावरील आठ निष्पाप पादचाऱ्यांचा बळी घेतल्याची घटना अद्याप ताजी असताना त्यापासून एसटी महामंडळाने बोध घेतल्याचे सांगितले गेले खरे; परंतु सोलापूर एसटी बसस्थानकातून एका मद्यपी चालकाने एकही प्रवासी न घेता एसटी बस पळविल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एसटी महामंडळाच्या कारभारातील त्रुटी पुन्हा एकदा उघडय़ा पडल्या.
बाबासाहेब अण्णप्पा कोळी असे चालकाचे नाव आहे. त्याच्यासह वाहक अशोक श्रीपती भोसले याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागीय नियंत्रक कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. नऊ महिन्यांपूर्वी सोलापूर एसटी बसस्थानकावर एसटीच्या टपावर झोपलेल्या प्रवाशांचा विचार न करता मद्यपी चालकाने एसटी बस पळविली होती. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा मद्यपी चालकाकडून एसटी बस परस्पर पळवून नेण्याची घटना घडल्यामुळे प्रवासीवर्गात संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
कोल्हापूर आगाराची कोल्हापूर-सोलापूर एसटी बस (क्रमांक एमएच १४ बीटी-०९६५) प्रवाशांसह घेऊन चालक बाबासाहेब कोळी सोलापूर एसटी बसस्थानकावर आला. बस आगारात थांबल्यानंतर चालक बसमध्येच झोपी गेला. त्यावेळी बसमध्ये वाहक व प्रवासी कोणीही नव्हते. स्वत:ला कशाचीच शुध्द नसताना चालक कोळी याने अचानकपणे बस सुरू करून थेट सुमारे शंभर किलोमीटर अंतराचा पल्ला गाठत सांगोला एसटी बसस्थानकापर्यंत नेली.
दरम्यान, या घटनेची वेळीच माहिती मिळाल्याने एसटीच्या दक्षता पथकाने सांगोल्यात चालक कोळी यास ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्य प्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुध्द सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चालक कोळी याच्यासह वाहक भोसले याचाही दोष आढळून आल्याने दोघांना निलंबित करण्यात आल्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी सांगितले.

Story img Loader